धोक्याची घंटा : सिंधुदुर्गात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण अधिक
रेडकर हॉस्पिटलच्या पुढाकाराने १३ ऑगस्टला मालवणात मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी व उपचार शिबीर
कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि जिल्हा रुग्णालय, सिंधुदूर्ग यांचाही सहभाग
मालवण | कुणाल मांजरेकर
कॅन्सरबाबत सिंधुदुर्ग जिल्हा धोकादायक पातळीवर आला आहे. यामध्ये महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. भारतामधे दर चार मिनीटांनी ब्रेस्ट कॅन्सरची एक रुग्ण आढळत असून तर दर १३ मिनीटांनी ब्रेस्ट कॅन्सरची एक रुग्ण मृत्युमुखी पडत आहे. दर २८ पैकी एका महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता आहे. भारतामधे दर दहा लाख लोकसंख्येमागे ब्रेस्ट कॅन्सरचे २५८ रुग्ण आढळतात. मात्र सिंधुदूर्ग जिल्ह्यामधे मात्र हेच प्रमाण ५०० पेक्षा जास्त आहे. गेल्या चार वर्षांमधे रुग्णांच्या प्रमाणात जवळपास २५० रुग्णांची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेडकर हॉस्पिटल आणि रिसर्च ट्रस्ट, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि जिल्हा रुग्णालय, सिंधुदूर्ग यांच्या वतीने १३ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत दैवज्ञ भवन, मालवण येथे मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. श्रीमती के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती डॉ. विवेक रेडकर यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. शमिका बिरमोळे, डॉ. गार्गी ओरसकर आणि रविकिरण तोरसकर उपस्थित होते.
सध्या भारतात होणाऱ्या कॅन्सरमध्ये ब्रेस्ट कॅन्सर हा पहिल्या क्रमांकावरील कॅन्सर आहे. त्यामुळेच ब्रेस्ट कॅन्सर’ जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच पहिल्या स्टेजमधे आढळलेला ब्रेस्ट कॅन्सर हा पुर्णपणे बरा होवू शकतो तसेच रोगाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये रुग्णच स्वतःला तपासून त्याचे निदान करू शकतो. त्यासाठी कोणत्याही तंत्रज्ञानाची गरज भासत नाही. भारतात दर चार मिनीटात एक स्त्री ब्रेस्ट कॅन्सरने प्रभावित होत आहे. सिंधुदुर्गात हे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे याबाबत संशोधन होणे अत्यंत महत्वाचे आहे, अन्यथा सिंधुदूर्ग जिल्ह्याला ब्रेस्ट कॅन्सरची राजधानी म्हणून नवीन ओळख मिळण्यास वेळ लागणार नाही. सिंधुदूर्ग जिल्ह्यामधे कॅन्सरवर उपचार करणारे, प्रिव्हेंटिव्ह म्हणजे रोग होवूच नये म्हणून कार्य करणारे, पॅलिएटिव्ह म्हणजे ज्यामधे औषधोपचारांद्वारे रुग्णाचे जीवनमान योग्य राखण्याचा प्रयत्न होतो, अथवा क्युरेटिव्ह म्हणजे ज्यामधे केमोथेरपी, रेडिएशन किंवा शस्त्रक्रिया यांचा समावेश होतो, यापैकी अधिकृत असे एकही केंद्र खाजगी किंवा सरकारी यंत्रणेकडे नाही. कॅन्सर रुग्णाबरोबर अत्यंत जवळचे रक्ताचे नातेसंबंध असलेल्या नातेवाईकांना कॅन्सर होण्याचे प्रमाण खूपच जास्त असते, त्यामुळे त्यांचे जेनेटिक मॅपिंग करून त्यांना कॅन्सर होण्याची किती शक्यता आहे हे शोधण्याची जेनेटिक मॅपिंगची सुविधा आपल्या जिल्ह्यात नाही. जिल्ह्यातील कॅन्सर पेशंट हे पुर्णतः कोल्हापूर, बेळगाव, मुंबईच्या भरवशावर कॅन्सरचे उपचार घेताना दिसतात. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील रुग्णांचे वाढते प्रमाण परिस्थितीला अधिकच भयावह बनवत आहे. या पार्श्वभूमीवर ब्रेस्ट कॅन्सरवर शस्त्रक्रिया आणि संशोधन करणाऱ्या डॉ. सुरेश भोसले आणि त्यांच्या टिमला रेडकर हॉस्पिटल रिसर्च ट्रस्ट आणि सिव्हिल सर्जन यांनी आमंत्रित केले आहे.
ही लक्षणे दिसल्यास स्तनाच्या कर्करोगाची शक्यता ….
स्तनाच्या कर्करोगाची काही लक्षणे दिसून आली आहेत. यामध्ये स्तन किंवा काखेत नवीन गाठ जाणवणे, स्तनाचा काही भाग जाड होणे किंवा सूज येणे, स्तनाच्या त्वचेची जळजळ/ पूरळ किंवा सुरकुत्या /खड्डा पडणे, स्तनाग्र भागात किंवा स्तनामध्ये लालसरपणा किंवा त्वचा सोलवटणे, स्तनाग्र आत खेचणे किंवा स्तनाग्र भागात वेदना, स्तनाग्र स्त्राव -रक्तस्राव दुधाव्यतिरिक्त इतर कोणताही स्त्राव, स्तनाच्या आकारात किंवा पोत यांत कोणताही बदल, स्तनाच्या कोणत्याही भागात वेदना, कुटुंबामधे अथवा जवळच्या नातेवाईकांमधे स्तनाचा कर्करोग असणे. अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी या शिबिरासाठी नावनोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे विश्वस्त रविकिरण तोरसकर यांनी केले आहे.
कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेमध्ये चान्सलर डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ब्रेस्ट कॅन्सर उपचार व संशोधन’ चालते. कॅन्सर रुग्णाबरोबर अत्यंत जवळचे रक्ताचे नातेसंबंध असलेल्या नातेवाईकांचे जेनेटिक मॅपिंग करून त्यांना कॅन्सर होण्याची किती शक्यता आहे, हे शोधण्याचे तसेच उपचार आणि संशोधनासाठी पुर्णपणे स्वतंत्र विभाग असलेले हे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले केंद्र आहे.
असेच एखादे पॅलिएटिव्ह व क्युरेटिव्ह उपचार केंद्र कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने सिंधुदूर्ग जिल्ह्यात सुरू केल्यास जिल्ह्यातील सर्वच कॅन्सर रुग्णांचे जीणे सुसह्य होईल. पंतप्रधान जन आरोग्य योजना किंवा महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील रुग्णांचेही यात भले होईल. तसेच भविष्यात या निसर्गरम्य जिल्ह्यात मेडिकल टुरिझमलाही चालना मिळेल, असे डॉ. रेडकर म्हणाले.
डॉ. सुरेश भोसले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या १२ देशांमधे सुमारे १८ संशोधन प्रबंध सादर केले आहेत. विशेष म्हणजे ते सर्व प्रबंध ‘ब्रेस्ट कॅन्सर’ या विषयावरच आहेत. ‘जेनेटिक मॅपिंग इन फर्स्ट डिग्री रिलेटिव्हज ऑफ कॅन्सर पेशंट’ या विषयावर त्यांचे जागतिक मान्यताप्राप्त संशोधन आहे. कोणत्याही युनिव्हर्सिटीचे स्वतः चान्सेलर हे एक कार्यरत रिसर्च सर्जन असणे हे भारतातील पहिले उदाहरण असेल. त्यांनी जवळ जवळ दिड हजार अवघड ब्रेस्ट कॅन्सर शस्त्रक्रिया यशस्वी करून हजारो महिलांना नवजीवन दिले आहे. ‘प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर’ म्हणजेच रोगानंतर इलाज करून रोगाचे साईड इफेक्ट आणि भोग भोगण्यापेक्षा रोग होवूच न देणे याला ते जास्त महत्व देतात. या शिबिरामध्ये रुग्ण तपासण्यापुर्वी ते महिलांचे या आजाराबाबत थोडक्यात प्रबोधन करणार आहेत.
चाळीशी नंतरच्या महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण जास्त
२५ ते ६० या वयोगटातील महीला, विशेषतः चाळीशीनंतरच्या महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यासाठी १६ ते २५ या वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थीनी व युवतीना ब्रेस्ट कॅन्सर तपासणीचे प्रत्यक्ष ट्रेनिंग देण्यात येणार आहे. जेणेकरून त्या भविष्यात स्वतःची योग्य काळजी घेवू शकतील. तसेच मेडिकल व पॅरामेडिकल स्टाफ, आशाताई, अंगणवाडी सेविका, एन.सी.डि. स्टाफ या महिला, ज्या घरोघरी जावून ब्रेस्ट कॅन्सर सर्वेक्षण करू शकतात. महिला मंडळे, बचत गट, मच्छिमार महिला संघटना, महिला ग्रामपंचायत सदस्य यांनी या शिबिरात अवश्य सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. सुरेश भोसले यांच्या प्रबोधनानंतर कणकवली येथील स्त्री रोगतज्ञ डॉ. शमिका बिरमोळे या सर्व महिलांना मार्गदर्शन करणार आहेत.
वर्षभर मोफत राबवणार उपक्रम ; दर आठवड्यात तपासणी
रेडकर हॉस्पिटल रिसर्च ट्रस्ट, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि जिल्हा रुग्णालय, सिंधुदूर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या या कार्यक्रमाला लायन्स क्लब, महिला मंडळे तसेच मच्छिमार महिलांचे सहकार्य लाभले आहे. हा उपक्रम पुढील वर्षभर राबविण्यात येणार असून डॉ. शमिका बिरमोळे या दर बुधवारी सकाळी ९ वाजता ग्रामिण रुग्णालय, मालवण येथे संशयित रुग्णांची तपासणी करणार आहेत. तर डॉ. गार्गी ओरसकर या दर मंगळवार ते गुरूवार दुपारी १२.३० ते २ वा. या वेळेत रेडकर हॉस्पिटल, मालवण येथे सदर रुग्णांची तपासणी करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. ब्रेस्ट कॅन्सरचे संशयीत रुग्ण तसेच पुर्वी कॅन्सर झाल्यामुळे उपचार चालू असलेले रुग्ण सेकंड ओपिनियन घेण्यासाठी या शिबिराचा लाभ घेवू शकतात. हे तपासणी शिबीर पुर्णतः मोफत आहे. दारिद्र्य रेषेखालील तसेच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या रुग्णांना सर्व उपचार मोफत देण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील सामाजिक काम करू इच्छिणा-या तसेच स्वतःचे कॅन्सर परिक्षण करून घेवू इच्छिणा-या महिलांनी आपली नोंदणी रेडकर हॉस्पिटल, मालवण येथे ७५८८५४४७०० या क्रमांकावर करावी किंवा डॉ. गार्गी ओरसकर यांच्याकडे ९०२८५५००२३ या क्रमांकावर करावी.