“नवोदय”च्या प्रवेश यादीत ३० विद्यार्थी परजिल्ह्यातील ? निलेश राणेंकडून “पोलखोल”
कागदपत्रांची पडताळणी करून स्थानिक मुलांना न्याय द्या ; अन्यथा आंदोलन छेडणार
कुणाल मांजरेकर | सिंधुदुर्ग
जवाहर नवोदय विद्यालय सांगेलीत इयत्ता सहावीसाठी यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या यादीत निवडण्यात आलेल्या ८० विद्यार्थ्यांपैकी तब्बल ३० विद्यार्थी परजिल्ह्यातील असल्याची पोलखोल भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणेंनी केली आहे. यामुळे स्थानिक मुलांवर अन्याय झाला असून विद्यालय प्रशासनाने प्रवेशासाठी निश्चित केलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी तातडीने करून घ्यावी, याठिकाणी एकही स्थानिक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिला तर आंदोलन छेडण्याचा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयात दरवर्षी सहावी पासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. अनेकदा घाटमाथ्यावरील पालक स्थानिक संस्थाचालकांना हाताशी धरून बोगस प्रवेश दाखवून आपल्या मुलांना जिल्ह्यातून परीक्षेला बसवत असल्याने स्थानिक मुलांवर अन्याय होतो. यंदा मालवण तालुक्यासह अन्य काही ठिकाणी राजकिय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास मज्जाव केल्याची घटना घडली. त्यामुळे स्थानिक मुलांना त्याचा फायदाही झाला. तरीदेखील मालवण वगळून अन्यत्र मोठ्या प्रमाणात परजिल्ह्यातील विद्यार्थी नवोदयच्या परीक्षेला प्रविष्ट झाले. अलीकडेच नवोदयच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये ८० विद्यार्थी निवडण्यात आले असून यामध्ये तब्बल ३० विद्यार्थी परजिल्ह्यातील असल्याचा आरोप भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे.
या संदर्भात त्यांनी व्यवस्थापक, जवाहर नवोदय विद्यालय सांगेली यांना लेखी पत्र देत तक्रार नोंदवत आपल्या विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र पडताळणी करण्याची मागणी केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाव देणाऱ्या आपल्या जवाहरलाल नवोदय विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सदोष असल्याचे समोर आले आहे. आमच्या माहितीनुसार ८० पैकी ३० विद्यार्थी हे पहिली ते चौथी शिक्षण इतर जिल्ह्यात पूर्ण करून त्यानंतर काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून आले आहेत. प्रवेशासंबंधी त्यांच्या कागदपत्रात अफरातफर करत या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश देण्यात आला आहे. ही बाब सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. तरी आपण त्वरित आपल्या विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेशावेळी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करावी. या मागणीचा गंभिर्यपूर्वक विचार करून त्वरित योग्य ती कारवाई करावी. अन्यथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा निलेश राणेंनी दिला आहे.