गटार, व्हाळी सफाईतील आरोपांच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेकडून श्वेतपत्रिका जाहीर

राजकिय आरोपांचे केले खंडन ; गटार- व्हाळी खोदाईतील विलंबावर स्पष्टीकरण

२०१६ पासून गटार खोदाईवर ३६.१९ लाख खर्च झाल्याची दिली माहिती

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहरातील गटार आणि व्हाळ्यांच्या साफसफाई वरून नगरपालिका प्रशासनाला सातत्याने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. राजकिय पक्षाच्या नेत्यांकडूनही प्रशासक असलेल्या मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह पालिका प्रशासनावर वारंवार टीका केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने गटार आणि व्हाळी साफसफाई बाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे. यामध्ये यंदा गटार आणि व्हाळ्यांची खोदाई करण्यासाठी झालेल्या विलंबा मागील वस्तुस्थिती नमूद करतानाच मागील पाच वर्षात पालिका प्रशासनाकडून गटार खोदाईवर ३६ लाख १९ हजार ४४२ रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून प्रसिद्धीस दिली आहे.

मालवण नगरपालिका प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मालवण शहरात पावसाळी पाणी निचरा होण्यासाठी व्हाळ्या, गटारे मधील गाळ काढून साफसफाई करणेची कामे प्रतिवर्षी केली जातात. त्यानुसार दिनांक ९ मार्च २०२२ पासून प्रशासकीय ठराव मंजूर करून प्रशासनाकडून याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आलेली होती. तात्काळ अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता घेऊन दिनांक ३० मार्च २०२२ रोजी १५ दिवसाची ई निविदा पहिली मागणी प्रसिध्द करण्यात आलेली होती. या मागणीस कोणताही प्रतिसाद निविदाधारक यांजकडून मिळालेला नाही. याकामी दिनांक २९ एप्रिल २०२२ पर्यंत १० दिवसाची दुसरी मागणी मुदतवाढ देण्यात आलेली होती. परंतु या मागणीस देखील निविदाधारकांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. सबब दिनांक ४ मे २०२२ पर्यंत सात दिवसाची तिसरी मागणी मुदतवाढ देण्यात आलेली होती. अशा प्रकारे एकूण तीन वेळा निविदा मागणी केल्यानंतर दिनांक ४ मे २०२२ रोजीच्या तिसऱ्या निविदा मागणीवेळी किमान निविदा प्राप्त झालेल्या होत्या. तात्काळ निविदा छाननी प्रक्रिया पूर्ण करुन दिनांक १२ मे २०२२ रोजीच्या प्रशासकीय ठरावान्वये न्युनतम दराची निविदा मंजूर करण्यात आली होती. सदरचे काम आपत्ती व्यवस्थानाशी संबंधीत असल्याने अत्यल्प कालावधीत कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करुन एका दिवसात करारनामा व कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे.

एकंदरीत निविदाधारकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने निविदा प्रक्रीया पुर्ण होण्यास दिड महिन्याचा कालावधी लागलेला आहे. तथापि तात्काळ दिनांक १३ मे २०२२ रोजी या कार्यालयाकडून मंजूर निविदाधारक सुधर्म इन्व्हायरमेंट सोल्युशन, नाशिक यांना कामाचे आदेश देण्यात आलेले होते. संबंधीत ठेकेदारांनी मालवण शहरातील व्हाळ्या गटारे साफसफाईस सुरुवात करण्यात आलेली होती. त्यानुसार दिनांक २५ जून २०२२ पर्यंत शहरातील ६० टक्के भागातील व्हाळ्या गटारे साफसफाई झालेली होती. शासनाकडून वारंवार अतिवृष्टीबाबत रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला असल्याने तसेच समुद्राची भरतीच्या वेळा विचारात घेऊन प्रामुख्याने शहरातील प्रमुख्य व्हाळ्या व समुद्राकडील जाणारे प्रवाह मोकळे करण्यात आलेले होते. परंतू दिनांक ४ जुलै २०२२ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे व समुद्राच्या भरतीमुळे साफसफाई केलेल्या व्हाळ्या गटारांमध्ये सातत्याने पडणा-या पाऊसामुळे पाला पाचोळा, प्लॅस्टीक व काचेच्या बॉटल्स, झाडांच्या फांदया अडकून प्रवाहात अडथळे निर्माण झाल्याने काही ठिकाणी पाणी थांबण्याचा प्रकार दिसून आला. परंतू तात्काळ ठेकेदार व नगरपरिषद कर्मचा-यामार्फत युद्ध पातळीवर सदरचे प्रवाह मोकळे करण्यात आलेले आहेत. पाणी थांबल्यामुळे या कार्यालयाकडे नुकसान झाल्याची किंवा पडझड झाल्याची नोंद नाही. मालवण शहर तीन बाजुने समुद्राने वेढलेले असून समुद्राच्या भरती ओहोटीचा भुजल पातळीवर परिणाम होतो व त्यामुळे अतिवृष्टी व भरतीच्या काळात शहरातील काही सखल भागात पाणी थांबण्याचे असे प्रकार दरवर्षी झालेले असून सरासरी दोन तासात पाणी ओसरले देखील आहे ही बाब विचारात घेणे गरजेचे आहे.

२०१६ पासून गटार, व्हाळी खोदाईवर ३६.१९ लाख खर्च

मागील पाच वर्षात गटार खोदाई खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. त्यामुळे २०१६ पासूनच्या खर्चाची आकडेवारी प्रशासनाकडून नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे नसन 2016-2017 एप्रिल 2016 रुपये 4,29,841/-, सन 2017-2018 एप्रिल 2017 – रुपये 4,24,136/-, सन 2018-2019 दिनांक 20/04/2018- रुपये 4,65,919/-, सन 2019-2020 दिनांक 08/03/2019 – रुपये 5,07,401/-, सन 2020 2021 दिनांक 05/05/2021- रुपये 5,99,177/-, सन 2021-22 दिनांक 11/05/2021- रुपये 6,72,943, तर सन 2022-23 दिनांक 13/05/2021- रुपये 4,25,125/- आणि न. प. आरोग्य विभागामार्फत 94900 असा 5,20,025 असा खर्च झाला आहे. राज्य दरसूचीमधील दरामध्ये होणा-या वाढ घटीमुळे खर्चामध्ये सरासरी वाढ झालेली दिसून येते, असेही या निवेदनात म्हटले आहे.

आपतकालिन परिस्थितीत खबरदारीची व तातडीची उपाययोजना म्हणून टोल फ्री क्रमांक 18002334381 कार्यान्वीत केलेला आहे. नगरपरिषदेने कार्यान्वीत केलेल्या WhatsApp नंबरवर 9405577431 प्राप्त होणा-या तक्रारींचे निरासन वेळोवेळी केले जात आहे. तसेच शहरातील सर्व प्रभागांमध्ये आपत्ती निवारण पथक नियुक्त करण्यात आलेले असून संबंधीतांचे संपर्क क्रमांक प्रसिध्द करण्यात आलेले आहेत. सदर पथक 24 तास कार्यरत असून असा प्रसंग उद्भवल्यास योग्य कार्यवाही करण्यास दक्ष आहेत. अशा प्रकारची उपाययोजना यंत्रणा यापूर्वी नगरपरिषदेकडून उपलब्ध करण्यात आलेली नव्हती याची देखील नोंद घेणे आवश्यक वाटते, असे या पत्रकात म्हटले आहे.

नाशिकच्या ठेकेदाराचा ठेका रद्द

यावर्षीचा ठेकेदार यांनी अपेक्षीत शिघ्रगतीने काम न केल्याने तसेच मजुरांची उपलब्धता न केल्यामुळे त्याचा ठेका रद्द करण्यात आलेला आहे. शहरातील गटार साफसफाईवर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये अथवा कोणत्याही भागात पावसाळी पाणी साचून हानी होऊ नये यासाठी नगरपरिषद आरोग्य विभागामार्फत मनुष्यबळ घेऊन मालवण शहरातील गटारे साफसफाई करण्यात आलेली आहे, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!