निलेश राणे भडकले : कितीही पोलीस फोर्स आणा, तुम्हाला सोडणार नाही !
मालवण शहराच्या समस्यांवरून मुख्याधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती ; मुख्याधिकारी मात्र निरुत्तर !
नगरपालिकेतील पाच वर्षांचा भ्रष्टाचार बाहेर आणण्या बरोबरच मुख्याधिकाऱ्यांची दक्षता विभागाकडे तक्रार करण्याचा राणेंचा इशारा
मालवण | कुणाल मांजरेकर
शहरातील सदोष गटार खोदाई, कचऱ्याचा प्रश्न, भाजपा नगरसेवकांच्या प्रभागांकडे दुर्लक्ष, रस्ता डांबरीकरणातील त्रुटी यांसह मुख्याधिकाऱ्यांच्या पक्षपाती भूमिकेवरून भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी सोमवारी आक्रमक पवित्रा घेत मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र यावेळी उपस्थित झालेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर मुख्याधिकारी देऊ शकले नाहीत. मुख्याधिकारी शिवसेनेचे सीईओ असल्या प्रमाणे वागत असून आमदार वैभव नाईक यांच्या किती आहारी जाणार ? असा सवाल करून आता राज्यात भाजपचे सरकार आले आहे, पाच वर्षातील भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावाच लागणार, असा इशारा देतानाच मुख्याधिकाऱ्यांची शासनाच्या दक्षता विभागाकडे (Vigilance Department) तक्रार करणार असेही निलेश राणे म्हणाले.
भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी सोमवारी मालवण शहराच्या विविध समस्यांबाबत नगरपालिकेला धडक दिली. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यावर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. तुम्ही शासनाचे मुख्याधिकारी आहात की शिवसेनेचे ? असा सवाल करून आमदाराच्या किती आहारी जाणार ? मालवण शहराचे तुम्ही वाटोळे करून टाकले असून आता राज्यात आमचे सरकार आहे. तुम्हाला महाराष्ट्राचे टोक दाखवू का ? नगरपालिकेमार्फत ठराविक नगरसेवकांच्या मतदार संघात गटारांची साफसफाई केली जाते. विविध विकास कामे केली जातात, पण भाजपा नगरसेवकांच्या वार्डात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, याबाबत निलेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
निलेश राणे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा धागा पकडून निलेश राणे यांनी मुख्याधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. कितीही पोलीस फोर्स आणा, शहराच्या प्रश्नांवर हयगय केल्यास तुम्हाला सोडणार नाही, आमची सत्ता नव्हती तेव्हा आम्ही गप्प बसलो नाही, आता तर आमची सत्ता आली आहे, भ्रष्टाचार करुन गप्प राहायला आता राज्यात ठाकरे सरकार नाही, शिंदे- भाजप सरकार भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही, अशा शब्दात निलेश राणे यांनी ठणकावले. यावेळी माजी सुदेश आचरेकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, राजू वराडकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे यांनी शहराच्या प्रश्नावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, ललित चव्हाण, राजू बिडये, प्रमोद करलकर, जगदीश गावकर, विलास मुणगेकर, आबा हडकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.