मुंबई-गोवा महामार्गाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा
महामार्ग अधिकाऱ्यांसह संबंधित विभागांना केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांचे आदेश
माजी खासदार निलेश राणे यांनी घडवून आणली बैठक
कणकवली (प्रतिनिधी) : महामार्ग प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे वाढलेले अपघात, मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रलंबित प्रश्नांवर केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महामार्ग अधिकारी, महामार्ग पोलीस, प्रांताधिकारी आणि प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ यांची बैठक रविवारी कणकवली येथे झाली. यावेळी या मार्गावरील विविध अपूर्ण कामांवर चर्चा झाली. यावेळी ओरोस आणि वेताळ बांबर्डे येथील अपूर्ण असलेल्या कामासंदर्भात त्वरित भूसंपादन करण्याच्या सूचना ना. नारायण राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांच्या कुडाळ तालुक्यातील दौऱ्यावेळी वेताळ बांबर्डे येथे प्रकल्पग्रस्तांनी आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या होत्या, त्यापैकी संदीप गोडकर व नितीन ओरोसकर यांची जमीन संपादित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून वाहतूक पोलिसांनाही महामार्ग अपघात नियंत्रणासाठी सुचना दिल्या. यावेळी माजी खासदार निलेश राणे, आनंद शिरवलकर आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.