मालवण नगरपरिषद बनलीय भ्रष्टाचाराची “युनिव्हर्सिटी” ; निलेश राणेंचा घणाघात

वैभव नाईक पळपुटे आमदार ; ७ वर्षात घेतल्या केवळ दोन आमसभा

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण नगरपरिषद भ्रष्टाचाराची “युनिव्हर्सिटी” बनल्याचा आरोप भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी येथील भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. वैभव नाईक ७ वर्ष आमदार आहेत. मात्र या ७ वर्षात २०१५ आणि २०१७ मध्येच आमसभा घेण्याचे धारिष्ट्य त्यांनी दाखवले. आज ग्रामीण भागात आमदारा विषयी नाराजी आहे. भविष्यात कोणीही आमदार चालेल, पण हा नको, अशी जनतेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे आमसभा घेतली तर लोक तुटून पडणार, या भितीपोटी आमसभा घेण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे.

या पत्रकार परिषदेला माजी सुदेश आचरेकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, राजू वराडकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे यांच्यासह भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजपा भटके विमुक्त आघाडी सेलचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब गोसावी, सचिन इंगळे, युवा मोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, राजू बिडये, महेश सारंग, अभय कदम, प्रमोद करलकर, जगदीश गावकर, विलास मुणगेकर, आबा हडकर तसेच भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी निलेश राणे म्हणाले, मालवण नगरपालिकेत मागील पाच वर्षात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. शिवसेनेचे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि आमदारांनी मिळून शहरावर डाका टाकण्याचे काम केले असून मुख्याधिकाऱ्यांच्या नजरेसमोर हा सर्व भ्रष्टाचार सुरू होता. शहराची अवस्था आज बिकट बनली असून गटारे सद् नाहीत, फायर ब्रिगेडसाठी जी गाडी आणली आहे, ती शहरातील चिंचोळ्या भागात जाऊ शकत नाही. कामगारांचे पगार देऊ शकत नाहीत, पण यांचे घर भरायला यांच्याकडे बक्कळ पैसा आहे. स्वतःच्या बापाचा माल असल्या प्रमाणे पालिकेचा पैसा उधळला जात आहे, असे ते म्हणाले.

हे शिंदे – फडणवीस सरकार… प्रत्येकावर कारवाई होणार !

मालवण नगरपालिकेतील भ्रष्टाचारावर पांघरूण घालायला हे ठाकरे सरकार नाही. हे शिंदे – फडणवीस सरकार आहे. मालवणचा पैसा लुटणाऱ्या प्रत्येक भ्रष्टाचाऱ्यावर कारवाई होणार, तसेच मुख्याधिकाऱ्यांची चौकशी लावणार असल्याचे निलेश राणे म्हणाले.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!