मुंबई – गोवा महामार्गावर अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा !

खा. विनायक राऊत यांचे महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना आदेश

खा. राऊत यांनी आ. वैभव नाईक, संदेश पारकर यांच्यासह महामार्ग समस्यांचा घेतला आढावा

कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा असे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना दिले. कणकवली उड्डाणपुलावर आणखी उपाययोजना करा, वागदेतील जमीन धारकांना तातडीने मोबदला देऊन बंद असलेली मार्गिका खुली करा असेही आदेश श्री. राऊत यांनी दिले.

कणकवली विजयभवन येथे शनिवारी खा. राऊत यांनी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या उपस्थितीत महामार्ग समस्यांचा हायवे अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. कणकवली उड्डाणपुलावर ठेकेदाराच्या चुकीमुळे अपघात होऊन दोन तरूण मृत्‍यूमुखी पडले आहेत. यापुढे असे अपघात होणार नाहीत, या दृष्‍टीने तातडीने उपाययोजना करा, उड्डाणपुलावर ठेवलेले बॅरिकेट सहज दिसतील अशा उपाययोजना करा असे श्री. राऊत म्‍हणाले. वागदे येथील गोपुरी आश्रम ते गडनदी पुलापर्यंत ज्‍या जमीन मालकांचा मोबदला मंजूर झाला आहे. त्‍या मोबदल्‍याचे तातडीने वाटप करा आणि तेथील बंद असलेली दुसरी मार्गिका सुरू करा असेही निर्देश श्री.राऊत यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने आणि महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांना दिले.

कुडाळ तालुक्‍यातील वेताळ बांबार्डे येथील अण्णा भोगले यांच्या घरासमोर सातत्‍याने अपघात होत आहेत. त्‍याचबरोबर कुडाळ येथील हॉटेल आरएसएन समोरही अपघात होत आहेत. याठिकाणी पाणी साठणार नाही तसेच अपघाताची कारणे शोधून उपाययोजना करा असे श्री. राऊत म्‍हणाले. तसेच महामार्गावरील सर्व पुलांवर चार दिवसांतून एकदा सफाई करा म्‍हणजे पुलावर पाणी साठणार नाही असेही श्री. राऊत म्‍हणाले.

याप्रसंगी शिवसेना नेते अतुल रावराणे, कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे, कणकवली तहसीलदार आर.जे. पवार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, उपअभियंता महेश खट्टी, लोकसभा सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, संग्राम प्रभुगावकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, सुजित जाधव, कणकवली विधानसभा प्रमुख सचिन सावंत, रिमेश चव्हाण, योगेश तावडे आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!