बल्बमध्ये साकारला विठ्ठल ; कलाशिक्षकाची अनोखी विठ्ठलभक्ती !
वराडकर हायस्कूलचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांचे सादरीकरण
मालवण | कुणाल मांजरेकर
वराडकर हायस्कूल कट्टाचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी अनोख्या पद्धतीने लाईटच्या बल्ब मध्ये विठ्ठलाची प्रतिकृती साकारली आहे. रविवार १० जुलैला साजऱ्या होत असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक दिवस आधीच शनिवारी समीर चांदरकर यांनी आपलल्या कलाकृतीने अनोख्या पद्धतीने सर्वाना शुभेच्छा दिल्या आहेत.
मातीपासून तयार केलेली तीन सेंटीमीटर उंचीची ही मूर्ती बल्ब मध्ये उतरवताना अनेक वेळा अपयश आले. परंतु मनाशी केलेल्या निर्धाराला पांडुरंगाने साथ दिली आणि ही कलाकृती पूर्ण झाली, असे समीर चांदेरकर यांनी सांगितले. यापूर्वीही त्यानी अनेक वेगवेगळ्या कलाकृती साकारल्या आहेत. त्यांच्या कलेचा अनेक स्तरावर सन्मान झाला आहे.
विठ्ठलाच्या कलाकृती बाबत समीर चांदरकर यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.
अंधारल्या मार्गावरी.. कधी रुते पायी काटा..
तुझ्यासंगे प्रवासात…
प्रकाशमान जाहल्या वाटा.. धावून येशील संकटात..
देसी दुबळ्यांना हात..
जरी आलो नाही पंढरपुरा..
तुझी नित्य असे साथ..
थॉमस अल्वा एडिसन. ज्यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला. या शोधामुळे समस्त मानव जातीचे भवितव्य उजळून निघाले. पण कित्येक वर्ष अंधारात चाचपडत असलेल्या दिन दुबळ्यांना प्रकाशाची वाट दाखवणारा पांडुरंग आजही आपलं आयुष्य प्रकाशमय करीत आहे. गेली दोन वर्ष तुझ्या दर्शनाला मुकलेले भक्तगण आज नव्या जोशात वारीत बेभान होऊन नाचत आहेत. सोसाट्याचा वारा, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता पांडुरंग नामी तल्लीन झालेले आहेत. कोविड काळात वारकरी पंढरपूरला जाऊ शकले नाही, परिस्थिती फार गंभीर होती. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण होता. खरंतर या काळात आपल्या प्रिय भक्तांना भेटण्यासाठी पांडुरंग कोणत्या ना कोणत्या रूपात मदतीला धावून आला. कधी डॉक्टर, कधी पोलीस, तर कधी सफाई कर्मचारी बनुन त्याने आपल्या अस्तित्वाचा साक्षात्कार दिला. पांडुरंगाचा हाच साक्षात्कार या कलाकृतीच्या माध्यमातून साकार करण्याचा छोटासा प्रयत्न केल्याचे समीर चांदरकर यांनी सांगितले.