आचरा येथील “त्या” कंत्राटी वायरमनच्या कुटुंबियांना १ लाखाचे अर्थसहाय्य
आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश ; आ. नाईकांनी मानले उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांचे आभार
कुणाल मांजरेकर
मालवण : विजेचा धक्का लागून अपघाती मृत्यू झालेले आचरा येथील महावितरण कंपनीचे कंत्राटी वायरमन आनंद कृष्णा मिराशी यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून एक लाख रुपयाचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी मंजूर केला असून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हा निधी वर्ग करण्यात आला आहे. त्याबद्दल उद्धव ठाकरे व ना. एकनाथ शिंदे यांचे आ. वैभव नाईक यांनी आभार मानले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे आचरा उपविभाग येथे कार्यरत असलेले कंत्राटी वायरमन व आचरा, वरचीवाडी येथील रहिवासी आनंद कृष्णा मिराशी हे विद्युत पोलवर वीज दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा धक्का लागून त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या अपघाती मृत्यूने मिराशी कुटुंबावर मोठे संकट ओढवले. श्री. मिराशी यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची व हालाखीची असून त्यांच्यावरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. त्यामुळे मिराशी कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अर्थसहाय्य मिळावे अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या मागणीची दखल घेऊन माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद मिराशी यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून मानवतावादी दृष्टिकोनातून विशेष बाब म्हणून एक लाख रुपये आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे. हे आर्थिक सहाय्य सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाले असून त्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. लवकरच सदर रकमेचा धनादेश आनंद मिराशी यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात येणार आहे, अशी माहिती आ. वैभव नाईक यांनी दिली आहे.