चौके साळेल लगतच्या जंगलात आढळला सडलेल्या स्थितीतील मृतदेह
मृतदेह कुणकवळे येथील बेपत्ता वृध्दाचा असल्याचे निष्पन्न
मालवण : चौके पासून साळेलच्या लगत असलेल्या चौके हद्दीतील ओझर या जंगलमय भागातील पायवाटेवर मंगळवारी सकाळी सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मालवण पोलीसांचे पथक याठिकाणी दाखल झाल्यानंतर सदरचा मृतदेह गेले महिनाभर बेपत्ता असलेल्या कुणकवळे टेंबवाडी येथील जनार्दन पुंडलीक घाडी (६५) यांचा असल्याचा निष्पन्न झाले आहे.
या मार्गावरुन साळेलला जाणाऱ्या एका ग्रामस्थाला मंगळवारी सकाळी सडलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. या ग्रामस्थाने लागलीच साळेलचे पोलीस पाटील रविंद्र गावडे याना याबाबतची माहिती दिली. पोलिस पाटील यांनी घटनास्थळावर जाऊन पहाणी करुन मालवण पोलीस ठाणे येथे घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती कुणकवळे गावात मिळताच येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गेला महिनाभर बेपत्ता असलेल्या कुणकावळे टेंबवाडी येथील जनार्दन पुंडलीक घाडी यांचा हा मृतदेह असल्याचा प्रथमदर्शी अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र मृतदेह पूर्णतः कुजलेल्या स्थितीत होता. मृतदेहाच्या जवळपास सापडेलेले कपडे तसेच पोलीस तपासानंतर हा मृतदेह बेपत्ता जनार्दन घाडी यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्यासह पोलीस काँन्टेबल डी. व्ही. जानकर, वेगुर्लेंकर, येरम यांनी येऊन पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. जनार्दन घाडी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परीवार आहे.