मालवणात अतिउत्साही पर्यटकांचा व्याप कायम ; पद्मगडावर गाड्या घेऊन “स्टंट”
सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी पद्मगडावर आलो : पर्यटकांच्या उत्तराने पोलीसही चक्रावले ; पर्यटकांवर दंडात्मक कारवाई
कुणाल मांजरेकर
मालवण : तारकर्ली समुद्रात घडलेल्या दुर्घटनेनंतर कोकण किनारपट्टी वरील पर्यटनाला ब्रेक बसला आहे. या दुर्घटनेत दोष कोणाचा ? हा मुद्दा विवादित असला तरी या दुर्घटनेनंतर कोकणच्या “बदनामी” ची व्यापक मोहीम सोशल मीडियावर राबवण्यात आली. या घटनेनंतर देखील “अतिउत्साही” पर्यटकांचा उपद्रव कायम असल्याचे चित्र मालवण मध्ये दिसून येत आहे. मंगळवारी सकाळी ओहोटीमुळे दांडी येथून तयार होणाऱ्या वाळूच्या मार्गातून चारचाकी गाड्या घेऊन काही हौशी पर्यटक थेट पद्मगडावर पोहोचले. याठिकाणी त्यांची स्टंटबाजी सुरू असल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच मालवण पोलिसांनी याठिकाणी जात संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी आपण येथे आल्याचे अजब उत्तर या पर्यटकांनी दिले. या उत्तराने पोलिसही चक्रावून गेले.
तारकर्ली समुद्रात बोट उलटून झालेल्या अपघातात दोघा पर्यटकांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर कोकण किनारपट्टी वरील पर्यटनाला ब्रेक मिळाला असून पावसाळ्या पूर्वी एक आठवडा अगोदरच येथील जल पर्यटन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण कोकणच्या पर्यटन क्षेत्राची फार मोठी आर्थिक हानी झाली आहे. या दुर्घटनेनंतर मालवणच्या पर्यटनावर आसूड ओढण्याचे काम सोशल मीडिया मधून झाले. मात्र या घटनेनंतर देखील येथे येणारे पर्यटक स्वतः बेजबाबदार वागत असल्याचे वारंवार दिसून आले आहे.
दांडी येथून पद्मगडावर जाण्यासाठी तयार होणाऱ्या वाळू मार्गावरून थेट चारचाकी वाहने घेऊन पर्यटक पद्मगडावर जात असल्याचे प्रकार अलीकडे सातत्याने दिसून येत आहेत. मंगळवारी सकाळी देखील ५ ते ६ पर्यटकांच्या गाड्या पद्मगडावर गेल्याचे दिसून आले. याठिकाणी काहींकडून गाड्यांचे स्टंट सुरू होते. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर वाहतुक पोलीस गुरुप्रसाद परब यांनी पद्मगड गाठून या ठिकाणी आढळलेल्या पर्यटकांना खडेबोल सुनावले. यावेळी किल्ल्यावर जाण्यासाठी आम्ही येथे आल्याचे उत्तर त्यांनी दिले. या उत्तराने पोलीस देखील चक्रावून गेले. संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, पर्यटकांनी अशा प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालून किनाऱ्यावर जाऊ नये, असे पर्यटक आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी दिला आहे.