मालवण शहरातील गटार, व्हाळी खोदाईमधील “वास्तव” झालं उघड

केवळ व्हाळ्यांच्या तोंडावर साफसफाई ; आतील घाण, झाडीझुडपे जैसे थे : बहुतांशी गटारेही खोदाईविना

माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, गणेश कुशे यांनी केला “पर्दाफाश”

मुख्याधिकाऱ्यांनी पर्यटन महोत्सवा सारखा शहरात “कॅटवॉक” करून वास्तव पाहावं ; वराडकर यांचा सल्ला

कुणाल मांजरेकर : मालवण

पावसाळ्याच्या तोंडावर मालवण नगरपालिकेच्या वतीने शहरात व्हाळी, गटारांची साफसफाई हाती घेण्यात आली आहे. मात्र या साफसफाई मधील खरं “वास्तव” शनिवारी समोर आलं आहे. साफसफाई केलेल्या काही व्हाळ्यांच्या तोंडावर केवळ दिखाव्या पुरती स्वच्छता करताना आतील कचरा आणि झाडी झुडपे जैसे थे ठेवण्यात आली आहे. गटारांची देखील तीच परिस्थिती असून अनेक ठिकाणी अद्याप गटार खोदाई सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे काही ठिकाणी नागरिकांनीच स्वतः आपल्या परिसरात गटारे स्वच्छ केली आहेत. माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि भाजपचे माजी गटनेते गणेश कुशे यांनी पत्रकारांना सोबत घेऊन या गटारे आणि व्हाळयांच्या साफसफाई मोहीमेचा “पर्दाफाश” केला.

दरम्यान, शहरात संपूर्ण गटार आणि व्हाळ्यांची स्वच्छता होत नाही, तोपर्यंत ठेकेदाराला बील अदा करू नये, अशी मागणी राजन वराडकर यांनी केली आहे. यासाठी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या पर्यटन महोत्सवात मुख्याधिकाऱ्यांनी चांगले कॅटवॉक केले होते. असेच कॅटवॉक शहरात करून शहरातील परिस्थितीची त्यांनी पाहणी करावी, असा सल्ला श्री. वराडकर यांनी केली आहे.

मालवण शहरात सुरू असलेल्या व्हाळी, गटार खोदाईचा पंचनामाच माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी शनिवारी केला. भाजपचे माजी गटनेते गणेश कुशे यांच्या सोबत पत्रकारांना घेऊन शहरातील अनेक भागात जाऊन खोदाई केलेल्या गटार व्हाळी यांची पाहणी केली. कचरा, चिखल याचे साम्राज्य गटार, व्हाळी यांच्यात कायम असेल तर खोदाई नेमकी कशाची केली ? असा संतप्त सवाल उपस्थित करत पालिका प्रशासनाच्या कारभारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दिखाऊ पद्धतीने खोदाई होत असेल तर पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणार कसा ? अनेक भागात पाणी तुंबण्याची भीतीही वराडकर, कुशे यांनी व्यक्त केली. प्रशासनानाने ‘हम करे सो कायदा’ प्रकार आता थांबवावा. प्रशासक म्हणून ताबा मिळाल्यानंतर मुख्याधिकारी सत्तेची धुंदी आल्याप्रमाणे काम करत आहेत का ? असा प्रश्न पडत आहे. मात्र मनमानी कारभार वेळीच न थांबल्यास एक दिवस जनताच रस्त्यावर उतरेल, तेव्हा यांना पायउतार केल्याशिवाय ही जनता स्वस्थ बसणार नाही. हेही मुख्याधिकारी यांनी लक्षात घ्यावे. मुख्याधिकारी यांनी वेळीच कारभार सुधारावा असे वराडकर म्हणाले. आपली बांधीलकी जनतेशी आहे. मुख्याधिकारी यांच्याशी आपला वैयक्तिक वाद नाही. त्या पदाशी, त्या खुर्चीशी वाद आहेत. तेही जनहिताच्या दृष्टीने योग्य कारभार होत नाही म्हणून. जनतेचा पैसा योग्य पद्धतीने खर्च होऊन जनतेला सोई सुविधा मिळत असतील तर त्याला जनहिताचा कारभार म्हणतात. जनतेचे पैसे वाया जात असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा वराडकर यांनी दिला आहे. कोणत्याही वेळी पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही सर्व कामे राहून जाणार आहेत. मग जनतेच्या होणाऱ्या गैरसोयीला मुख्याधिकारी जबाबदार राहतील, असे सांगून यापूर्वी शहरात वार्षिक ठेक्यातून ही कामे केली जात होती. आता या कामासाठी नाशिकचा ठेकेदार नियुक्त केला असल्याचे समजते. तो स्थानिक ८ ते १० कामगार घेऊन गटार, व्हाळ्यांची साफसफाई करीत आहे. एकाच ठिकाणी सर्व काम पूर्ण न करता सर्वत्र थोडे थोडे काम करून थुकी लावण्याचे प्रकार त्याच्याकडून सुरू असून व्हाळ्यातील माती आणि गाळ न काढता केवळ झाडू मारण्याचे काम करण्यात येत असल्याचे राजन वराडकर म्हणाले. दरम्यान, मेढा भागातही दोनपिंपळ मार्ग, चिवला बिच, मेढा, राजकोट याठिकाणी तर गटार खोदाई झालीच नसल्याचे गणेश कुशे यांनी सांगितले.

नागरिकांना केले “हे” आवाहन

मालवण शहरात सर्वत्र गटार आणि व्हाळ्यांची खोदाई करण्याची आमची मागणी आहे. उद्या गटार आणि व्हाळ्यांची योग्य खोदाई न झाल्यास पावसाळ्यात धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी आपापल्या भागात गटार आणि व्हाळ्यांची पूर्णतः साफसफाई होते का, याकडे स्वतः लक्ष द्यावे. आपल्या परिसरात हे काम चुकीच्या पद्धतीने झालेले असल्यास नगरपालिकेत घेऊन लेखी तक्रार करावी. या तक्रारीचा नमुना आम्ही नगरपालिकेत उपलब्ध करून देणार आहोत, असे आवाहन राजन वराडकर यांनी केले आहे.

मालवण शहरात कचऱ्याची परिस्थिती गंभीर

मालवण शहरात कचरा समस्याही गंभीर बनत चालली आहे. कचरा वेळेत उचलला जात नाही. त्यामुळे ठिकठिकाणी अनेक भागात कचऱ्याचे ढीग दिसून येतात. घरोघर उचलला जाणारा कचराही तसाच आहे. कचऱ्याच्या तक्रारीसाठी मुख्याधिकाऱ्यांनी मोबाईल नंबर जाहीर केला आहे. तो लागतो की नाही, ही बाब दूरची आहे. पण जर कचऱ्याच्या ठेक्यात नमूद केल्या प्रमाणे शहरात दररोज कचरा उचलला जात असेल तर अशा प्रकारे नंबर जाहीर करण्याची गरज काय ? त्यामुळे शहरात कचरा उचल केला जात नाही, हे स्वतः मुख्याधिकाऱ्यांनीच मान्य केले आहे. सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्राचार्यांना कचऱ्याची तक्रार करण्यासाठी नगरपालिकेत यावे लागते, यासारखे दुर्दैव नाही, असे वराडकर यांनी सांगितले. डम्पिंग ग्राउंड ठिकाणी शहरातून सक्षन करून आणला जाणारा मैला ज्या ठिकाणी टाकला जातो, त्या ठिकाणाहून तो वाहत रस्त्यावर येतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. याठिकाणी लाखो रुपये खर्चून एसटीपी प्लांट बसवण्यात आला आहे, पण अद्याप तो कार्यान्वित करण्यात आलेला नाही. मग केवळ निधी खर्च करण्यासाठीच प्रशासन काम करतंय का ? असा सवाल त्यांनी केला.

७२ लाखांच्या फायर फायटरचा उपयोग होणार का ?

नगरपालिकेने अत्याधुनिक अग्निशमन बंब खरेदी केला आहे. त्यासाठी साधारण ७२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. पण शहराची भौगोलिक परिस्थिती पाहता हा अग्निशमन बंब खरोखरच उपयोगी ठरणार का ? शहरातील गवंडीवाडा येशू गणेश मंदिर, मशीदगल्ली, मेढा राजकोट आडवण सारख्या चिंचोळ्या भागात आगीची दुर्घटना घडली तर हा अग्निशमन बंब त्याठिकाणी पोहोचणार कसा ? असा सवाल श्री. वराडकर यांनी उपस्थित केला.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!