नारायण राणेंकडून देवबाग वासियांची फसवणूक ; ग्रामस्थांच्या जीविताशी खेळ
आ. वैभव नाईक यांचा आरोप ; तर ग्रामस्थच राणे पिता- पुत्रावर ४२० चा गुन्हा दाखल करतील
कुणाल मांजरेकर
मालवण : नारायण राणे हे केंद्रीय मंत्री व जबाबदार व्यक्ती असून देखील पुत्रपेमापोटी त्यांनी वर्कऑर्डर नसलेल्या देवबाग येथील धुप्रतिबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन केले. याद्वारे ते ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ करत आहेत. निलेश राणेंनी आमच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याचे वक्तव्य केले आहे. मात्र वस्तुस्थिती पाहता वर्कऑर्डर नसलेल्या बंधाऱ्याचे भूमिपूजन करून नारायण राणेंनी देवबाग वासियांची फसवणूक केली आहे. त्यामुळे देवबागवासीय राणे पितापुत्रांवर ४२० चा गुन्हा दाखल करतील, अशी खोचक टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
कुडाळ मालवण मतदारसंघाचा आमदार या नात्याने मी सातत्याने प्रयत्न करून ४ कोटी निधी मंजूर करून देवबागच्या बंधाऱ्याचे काम प्रत्यक्ष सुरु केले आहे. त्याचबरोबर सर्जेकोट, तळाशील या भागातही कोट्यवधी रुपये मंजूर करून बंधाऱ्याची कामे प्रत्यक्षात सुरु केली आहेत. इतरही काही ठिकाणी बंधारे मंजूर असून त्यांच्या परवानग्या मिळविल्या जात आहेत. सुरु झालेल्या कामांसाठी ३ ते ४ वर्षे पाठपुरावा करावा लागला. त्यासाठी सीआरझेड, एमसीझेड, कांदळवन समिती या सर्वांच्या परवानग्या घ्याव्या लागल्या. खरंतर सीआरझेड कमिटी केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येते. त्यातील काही अधिकार राज्यसरकारकडे दिलेले असून राज्यसरकारकडे पाठपुरावा करून सर्व परवानग्या मिळविल्या आहेत. आता रीतसर बंधाऱ्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या परवानग्या मिळविण्यासाठी २ वर्षे प्रचंड मेहनत घ्यावी लागली. सर्व बाबींचा विचार करूनच प्रशासकीय यंत्रणा एखाद्या कामाला परवानगी देतात. तातडीने परवानग्या मिळत नसल्याने ही कामे रखडली होती.
… म्हणूनच निलेश राणेंना जनतेने दोनदा घरी बसवले
सीआरझेड परवानगी शिवाय धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम करता येत नाही, हे माजी खासदार असलेल्या निलेश राणेंना कधी कळणार नाही. मुळात त्यांना प्रशासकीय बाबींचा अभ्यासच नाही. त्यामुळेच दोन वेळा निवडणुकीत लोकांनी त्यांना घरी बसवले. देवबाग बंधाऱ्याला भाजपकडून एक कोटी रुपये आणले असे सांगत कोणत्याही प्रकारची वर्कऑर्डर नसताना बंधाऱ्याचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुत्र प्रेमाखातर केले. यामुळे खऱ्या अर्थाने त्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार केला आहे, असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.