… तर तुम्हाला कोणालाही मालवण सोडा, सिंधुदुर्गात फिरायला देणार नाही !
आदित्य ठाकरे, वैभव नाईकांना निलेश राणेंचा सज्जड इशारा
कुणाल मांजरेकर
मालवण : देवबाग गावात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या एक कोटी खासदार निधीतून होत असलेल्या संरक्षक बंधाऱ्याला पर्यावरण खात्याची परवानगी न मिळाल्याने हे काम थांबले आहे. या प्रकारावर भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून राणेंच्या खासदार निधीतून हे काम होत असल्याने शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून हे काम थांबवल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला असून उद्या तुमच्या या राजकारणामुळे देवबाग गावात सागरी अतिक्रमण होऊन एक जरी जीव गेला, तर तुम्हा कोणालाही मालवण सोडा, सिंधुदुर्गात फिरायला देणार नाही, असा इशारा श्री. राणेंनी दिला आहे.
देवबाग गावात सागरी अतिक्रमण होत असल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येथे तातडीची उपाययोजना म्हणून १ कोटीचा खासदार निधी उपलब्ध करून दिला आहे. मागील रविवारी या कामाचे नारायण राणे, निलेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. मात्र हे काम थांबले असून याबाबत निलेश राणेंनी व्हिडिओच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.
दोन दिवसांपूर्वी देवबागमध्ये नारायण राणेंच्या १ कोटी खासदार निधीतून बंधाऱ्याचं भूमिपूजन झालं. यासाठी कलेक्टर मॅडमनी परवानगी दिली, प्रशासकीय मान्यता मिळाली. आता एक परवानगी राहिलीय ती म्हणजे पर्यावरण खात्याची. या खात्याचे मंत्री आदित्य ठाकरे. स्थानिक आमदाराने कळवले हे राणेंचे काम आहे याला परवानगी मिळता नये, म्हणून हे काम थांबवले. किती खालच्या स्तरावर जाऊन हे राजकारण करतात ? लोकांचे जीव याना महत्वाचे नाहीत. फक्त निधी कोणी दिला तर नारायण राणेंनी. म्हणून हा निधी वापरता येता कामा नये, म्हणून अडचणी निर्माण करण्याचं काम सुरू आहे. काही झालं तरी हे काम सुरू होता नये म्हणून मंत्र्याला सांगून काम अडवायचं, ही लायकी या आमदार, मंत्र्यांची ! लाज वाटत नाही ? मंत्रीपदाची शपथ कशासाठी घेतो आपण ? किती विरोध करायचा एखाद्या विषयाला? हा राणेंचा विषय नाही, लोकांचा विषय आहे. उद्या समुद्राचे पाणी गावात घुसले तर एकही जीव शिल्लक राहणार नाही त्या गावातला. लाज वगैरे काही आहे की नाही शिल्लक ? की राजकारणासाठी विकून टाकलं तुम्ही ? उद्या गावाला काही झालं, समुद्राचं पाणी आत आल्यामुळे कोणाचा जीव गेला, तर ३०२ ची कारवाई कोर्टातून आम्ही यांच्यावर करायला भाग पाडू. कारण पोलीस स्टेशन मधून यांच्या तक्रारी कितीही दिल्या तरी घेणार नाहीत, म्हणून यांना मस्ती आलीय. पण उद्या तुमच्या या राजकारणामुळे देवबाग गावातील एक जरी जीव गेला, तर तुम्हाला कोणालाही मालवण सोडाच, सिंधुदुर्गात फिरायला देणार नाही, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.