डॉ. स्वप्नील पिसे यांच्या अपघाती निधनाने जुन्नरवर शोककळा ; खा. अमोल कोल्हेनी वाहिली श्रद्धांजली

कुणाल मांजरेकर

तारकर्ली पर्यटन केंद्रानजीकच्या समुद्रात घडलेल्या बोट दुर्घटनेत जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील मारुती पिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेने जुन्नरवर शोककळा पसरली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत डॉ. पिसे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

डॉ. स्वप्नील पिसे आपल्या कुटुंबियांसह तारकर्ली येथे पर्यटनासाठी आले होते. पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा येथे ते हॉस्पीटल चालवत होते. शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे ते परिसरात परिचीत होते. मंगळवारी दुपारी तारकर्ली मध्ये झालेल्या बोट दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉ. स्वप्निल पिसे यांच्या पश्च्यात पत्नी आणि एक मुलगी आहे. 

दरम्यान, प्रख्यात अभिनेते तथा शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत डॉ. पिसे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “आपल्या आळेफाटा (ता. जुन्नर) येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील मारुती पिसे यांच्यासह तारकर्ली (सिंधुदुर्ग) येथे बोट उलटून झालेल्या अपघातात समुद्रात बुडून आणखी एकाचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी समजली. दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली! पिसे कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व इतर उपचार घेत असलेले सर्व नागरिक लवकर बरे होवो, हीच आई-जगदंबेचरणी प्रार्थना!” अशी भावना डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!