आ. वैभव नाईक अकार्यक्षम असल्यानेच देवबाग, तळाशील ग्रामस्थांना त्रास : मनसेचा आरोप
दोन्ही बंधाऱ्याच्या कामावर ग्रामस्थांनी लक्ष ठेवावे ; अमित इब्रामपूरकर यांचे आवाहन
मालवण : आमदार वैभव नाईक अकार्यक्षम असल्यानेच देवबाग, तळाशील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागल्याचा आरोप मनसेच्या वतीने अमित इब्रामपूरकर यांनी केला आहे. आता देवबाग आणि तळाशील या दोन्ही बंधाऱ्यांची कामे मंजूर झाली असून ही कामे योग्य दर्जाची होण्यासाठी ग्रामस्थांनी या कामांवर लक्ष ठेवावे. यासाठी तांत्रिक दृष्ट्या लागणारी मदत तळाशील व देवबाग या दोन्ही गावच्या ग्रामस्थांना देण्यास मनसे तयार आहे. जर काम निकृष्ट आढळल्यास मनसे ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा एकदा काम बंद पाडेल, असा इशारा देखील श्री. इब्रामपूरकर यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, देवबागमध्ये जिओ ट्युब बंधाऱ्याचे काम होण्याअगोदर मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली १५ ऑगस्ट २०१९ रोजी देवबाग ग्रामस्थांना सोबत घेऊन पक्क्या स्वरुपाचा धूपप्रतिबंधक बंधारा व्हावा जिओ ट्युब नको यासाठी मनसेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले होते. अलीकडील काही वर्षांमध्ये येथील किनारपट्टीची धूप होत होती. यामुळेच मनसेने कायमस्वरूपी धूपप्रतिबंधक बंधारा मंजुर व्हावा म्हणून शासनाचे लक्ष वेधले होते, निवेदन दिले होते. परंतु आमदार वैभव नाईक यांचे जिओ ट्युब ठेकेदारासोबत हितसंबंध असल्याने जिओ ट्युब बंधारा मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर ते काम निकृष्ट झाले. या कामावर दोन कोटी पंचेचाळीस लाख निधी खर्च करून मंजूर करण्यात आले होते व त्याचे भूमिपूजन झाले होते. जिओ ट्युब बंधाऱ्याचे बांधकाम सुरू असताना जिओ ट्युब निकृष्ट असल्याने स्थानिक देवबागवासियांनी यावर आक्षेप घेतला होता व चालू असलेले काम बंद केले होते. तसेच मनसे नेते परशुराम उपरकर यांचे लक्ष वेधले होते. श्री.उपरकर यांनी तात्काळ देवबाग येथे धाव घेत निकृष्ट कामाची पाहणी केली होती. जिओ ट्युबसाठी खर्ची घातलेले सुमारे दोन कोटी पंचेचाळीस लाख निधी वाया गेला. हाच निधी त्यावेळेस मनसेच्या मागणीप्रमाणे जर देवबाग ते विठ्ठल मंदिर २.५ किलोमीटर पर्यंत संपूर्ण पक्क्या स्वरूपातील धुपप्रतिबंधक संरक्षक बंधाऱ्यासाठी वापरला असता तर आज मंजूर न झालेला बंधारा तीन वर्षापूर्वीच झाला असता. आमदार वैभव नाईक अकार्यक्षम असल्याने देवबाग तळाशिल ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागला.
आता पावसाळ्याच्या तोंडावर कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. भुमिपूजन झालेल्या तळाशिल व देवबाग येथील बंधाऱ्यांसाठी वापरण्यात येणारा दगड पहिल्या ४ फूटच्या थरात सुमारे ५०० किलो ते एक टन वजनाचा असून खालील २ फूट थरात ५० ते १०० किलोचे दगड प्रस्तावित असून त्याची रुंदी १५ मीटर आहे. ग्रामस्थांनी काम उत्कृष्ट होण्यासाठी ठेकेदारांवर, सुरु असलेल्या कामावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. यासाठी तांत्रिक दृष्ट्या लागणारी मदत तळाशील व देवबाग येथील दोन्ही गावच्या ग्रामस्थांना मनसे देण्यास तयार आहे. जर काम निकृष्ट आढळल्यास मनसे ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा एकदा काम बंद पाडेल, असे अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.
पालकमंत्र्यांना सिंधुदुर्ग किल्ल्याची ऍलर्जी आहे का ?
पालकमंत्र्यांना विजयदुर्ग किल्लाच का लागतो ? ज्याच्या नावाने जिल्ह्याला नाव दिले गेले आहे, त्या ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग बांधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाहणी केली, भुमिपुजन केले होते आणि कामही पूर्णत्वास नेले होते, त्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर ध्वजारोहण न करता विजयदुर्ग किल्ल्यावर ध्वजारोहण करण्याचा घाट का ? असा सवाल मनसेने केला आहे. भगवा ध्वज आंदोलनानंतर शिवसेनेची राज्यात पहिल्यांदा सत्ता आल्यानंतर सेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर कायमस्वरुपी भगव्या ध्वजाचे अनावरण केले होते. भारत सरकारने सिंधुदुर्ग किल्ल्याला २०१० मध्ये महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. विजयदुर्ग हा किल्ला ८२० वर्ष प्राचीन आहे आणि हा किल्ला ११९३ ते १२०६ मध्ये राजा भोज याने बांधला. १६५३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर हल्ला करून हा किल्ला आदिलशहा कडून आपल्या ताब्यात घेतला होता. तो महाराजांच्या काळातला नव्हता. मिळवला गेला होता. म्हणुन येणार्या १ मे पासून ध्वजारोहण विजयदुर्गवर न करता किल्ले सिंधुदुर्गवर करण्यात यावा अशी मनसेची मागणी आहे, असे मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.