देवबाग बंधाऱ्याचं “राणेस्टाईल” भूमिपूजन ; जाहीर सभेत नारायण राणे शिवसेनेवर गरजले
आठ वर्षे देवबागात पाऊस पडत होता, पूर येत होता, तो आमदाराला दिसला नाही काय ?
इकडचा आमदार हा “आमदार” नाही लोकांचे पैसे लुटणारा “लुटारू” ; राणेंची आ. वैभव नाईकांवर टीका
कुणाल मांजरेकर
मालवण : मागील महिन्यात ग्रामस्थांना दिलेल्या शब्दाप्रमाणे देवबाग गावात १ कोटी खासदार निधीतून मंजूर झालेल्या संरक्षक बंधाऱ्याचे भूमिपूजन रविवारी सकाळी देवबाग ख्रिश्चनवाडीत “राणे स्टाईल” पद्धतीने भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने उत्साहात करण्यात आले. यावेळी फटाक्यांची एकच आतिषबाजी करण्यात आली. यावेळी आयोजित जाहीर सभेत केंद्रीय लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेसह स्थानिक आमदार, खासदारांचा समाचार घेतला. मागील आठ वर्षे वैभव नाईक येथील आमदार आहेत. मग आठ वर्षे देवबागात पाऊस पडत होता, पूर येत होता, तो आमदाराला दिसला नाही काय ? असा सवाल करून इकडचा आमदार हा “आमदार” नाही लोकांचे पैसे लुटणारा “लुटारू” आहे. प्रत्येक कामात त्याची टक्केवारी असते. आजपर्यंत त्याने कोट्यवधी रुपये कमवले, मग स्वतःचे किमान एक कोटी रुपये घालून ग्रामस्थांना बंधारा का बांधून दिला नाही ? असा सवाल नारायण राणेंनी केला.
भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एप्रिलच्या अखेरीस देवबाग गावाचा दौरा केला होता. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी येथील सागरी अतिक्रमणाचा प्रश्न यंदा भीषण झाल्याचे सांगत येथे संरक्षक बंधारा बांधण्याची मागणी केली होती. त्यावेळी तात्पुरत्या स्वरूपात येथील बंधाऱ्यासाठी एक कोटीचा खासदार निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन नारायण राणे यांनी दिले होते. त्यानंतर तातडीने हा निधी मंजूर करण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी या खासदार निधीला मान्यता दिली होती. त्यानुसार रविवारी सकाळी नारायण राणे यांच्या हस्ते आणि निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवबाग ख्रिश्चनवाडीत या बंधाऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी फटाक्यांची एकच आतिषबाजी करण्यात आली. तसेच ब्राम्हण असेच ख्रिस्ती धर्मगुरूंच्या वतीने पूजन आणि आशिर्वचन करण्यात आले. या बंधाऱ्याच्या भूमिपूजना निमित्त भाजपाच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत नारायण राणेंनी शिवसेनेसह आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सुदेश आचरेकर, बाबा मोंडकर, धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, विजय केनवडेकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देवबाग ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी नारायण राणे म्हणाले, १९९० साली मी निवडून आल्यावर येथील ग्रामस्थांनी देवबाग गावाचे सागरी अतिक्रमणा पासून संरक्षण व्हावे आणि हा गाव कुंभारमाठला स्थलांतरीत होत आहे, तो वाचवा अशा दोन मागण्या केल्या. त्यावेळी मी साधा आमदार होतो, पण माझ्यात हिंमत होती, त्यामुळे हा गाव स्थलांतरित होणार नाही, असा शब्द मी दिला. येथील बंधाऱ्यासाठी आर्थिक तरतूद करून घेत बंधारा करून घेतला. येथील रस्ता अरुंद होता. पूर आला तर लोकांना बाहेर काढता यावे म्हणून देवबाग मधील रस्ता खास बाब म्हणून मंजूर करून घेतला. या रस्त्याच्या कामावेळी अनेक अडचणी आल्या. काही झाडं, घरं रस्त्याच्या मध्ये आली. यातील काहींनी स्वतःहून ती बाजूला करण्यास मदत केली. तर काहींनी नेहमीप्रमाणे व्यत्यय पण आणला. एक जंगली भेंडीचे झाड हटवण्यासाठी हायकोर्टाचा खर्च म्हणून मी स्वतःच्या पैशातून त्यावेळी १० हजारांची मदत केली. या बंधाऱ्याला आणि गावाला मोठा इतिहास आहे. ही सगळी कामं मी केली ती तुम्ही निवडून द्यावं म्हणून नाही तर माणुसकी म्हणून, असं नारायण राणे म्हणाले.
नारायण राणेंना आजही “त्या” पराभवाचं शल्य
देवबाग मधील भाषणात आ. वैभव नाईक यांच्यावर टीका करताना नारायण राणेंनी २०१४ च्या निवडणूकीतील पराभवाचं शल्य आजही बोलून दाखवलं. मी विधानसभेत काम करताना इतिहास निर्माण केला. विधानसभेच्या लायब्ररीत माझी भाषणे आहेत. इकडच्या आमदाराने निदान ती भाषणे वाचली असती तर दोन शब्द बोलू शकला असता. मागील आठ वर्षे पाऊस पडत होता, पूर येत होता, तो आमदाराला दिसला नाही का ? असा सवाल करून यामध्ये त्याची चूक नाही, चूक आपली आहे. मुख्यमंत्री झालेल्या माणसाला देवबाग वासियांनी पाडलं. हे शल्य आजही मी विसरलेलो नाही. आज ईश्वराने तुम्हाला देवबागचे ग्रामस्थ बनवलं आहे. हे निसर्गरम्य गाव आहे. तुम्हाला प्रगतीकडे कोण घेऊन जाईल, एवढी बुद्धिमत्ता, एवढं कौशल्य आणि एवढी ताकद कोणामध्ये आहे, हे तुम्ही ओळखलं पाहिजे होतं, असं राणे म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर राणेंची टीका
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात विकासाचं केलेलं एक काम सांगावं. आज गुजरात, तामिळनाडू ही राज्य महाराष्ट्रापुढे गेली आहेत. दरडोई उत्पन्नात तामिळनाडू, गुजरात पुढे गेला आहे. अगदी दरडोई उत्पन्नात गोवा सुद्धा पुढे आहे. साडेचार लाख रुपये त्यांचे दरडोई उत्पन्न आहे. तर सिक्कीमचं ४ लाख १० हजार दरडोई उत्पन्न आहे. पण महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न कमी होतंय. आज १ लाख ९४ हजार उत्पन्न आहे. यापूर्वी प्रगतशील महाराष्ट्र देशात वेगळा होता. पण आज चालवतय कोण ? असं सांगून राणेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर टीका केली.
आ. वैभव नाईकांची ठेकेदारांसमवेत पार्टनरशीप
आमदार वैभव नाईक यांची ठेकेदारां समवेत पार्टनरशीप असल्याचा आरोप राणेंनी केला. हा आमदार काम मंजूर करतो. मग ही कामं कोण घेतो माहिती घ्या. कोल्हापूरचा डाके त्याचा पार्टनर आहे. हा आमदार नाही, लोकांचे पैसे लुटणारा लुटारू आहे. स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे. त्याचा वाळूचा धंदा आहे. ८ वर्षात एवढे कमावले मग एक कोटी रुपये घालून स्वतःच्या पैशात देवबागचा बंधारा का नाही बांधून दिला ? एक कोटी रुपये त्याच्यासाठी जास्त नाहीत, असं सांगून शिवसेनेची लोकं आता महाराष्ट्र लुटत असल्याचा आरोप नारायण राणेंनी केला. खासदाराला शुद्ध मराठी बोलता येत नाही. हिंदी तर सोडाच. इंग्लिशचा पत्ता नाही. १० वीला दोनदा नापास झाला. खोटी सर्टिफिकेट देऊन आज तो आहे, असे सांगत खा. विनायक राऊत यांच्यावर देखील नारायण राणेंनी टीका केली.