क्यार वादळातील वंचित रापण मच्छिमारांसाठी निलेश राणेंचा पुढाकार
मत्स्य आयुक्तांशी केली चर्चा ; मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांचेही लक्ष वेधणार
कुणाल मांजरेकर
मालवण : क्यार वादळातील वंचित रापण मच्छीमार बांधवांना आर्थिक पॅकेज मिळण्यासाठी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात मत्स्य आयुक्तांशी निलेश राणे यांनी चर्चा केली. या संदर्भात श्री. राणे मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांची भेट घेऊन अन्यायग्रस्त मच्छीमारांच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडणार असल्याची माहिती भाजपचे प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी दिली आहे.
क्यार वादळातील १९४ मच्छीमार बांधव आर्थिक पॅकेजमधून वंचित राहिले आहेत. या मच्छीमार बांधवांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी यासाठी निलेश राणे यांचे कोचरेकर रापण संघामार्फत कमलेश कोचरेकर यांनी लक्ष वेधले होते. निलेश राणे यांनी मत्स्य आयुक्तांची चर्चा करता आर्थिक पॅकेजसाठी विशेष कॅबिनेट मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक आहे असे सांगण्यात आले. यासंदर्भातील पाठपुरावा आपण करत असून येत्या कॅबिनेटमध्ये याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे असे सांगण्यात आले. मच्छीमार बांधवांना आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी निलेश राणे यांच्या मार्फत करण्यात आली. सर्व मच्छिमारांना या योजनेतून लवकरात आर्थिक मदत मिळण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची भेट घेऊन मदत न मिळालेल्या मच्छीमार बांधवांच्या अडचणी समोर मांडणार आहेत, अशी माहिती विजय केनवडेकर यांनी दिली आहे.