वैद्य सुविनय दामले यांच्या “त्या” पत्राला माजी आ. वैभव नाईक यांचे जोरदार प्रत्त्युत्तर !

भाजपाच्या हिंदुत्वावर उपस्थित केले सवाल ; खाल्ल्या ताटात घाण करून मिळालेल्या विजयापेक्षा निष्ठेने मिळालेला पराभव हा कधीही श्रेष्ठ

मालवण | कुणाल मांजरेकर

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कुडाळ मधील वैद्य सुविनय दामले यांनी वैभव नाईक यांच्या नावे लिहिलेले पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यातून माजी आ. नाईक यांनी हिंदुत्वाची साथ सोडलेल्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून निवडणूक लढवल्याने त्यांचा पराभव झाल्याचे म्हटले होते. या पत्राला वैभव नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा आपल्यासाठी एक राजकीय पक्ष असेलही पण माझ्यासाठी ते माझे कुटुंब आहे. उद्धवजी हे माझे फक्त पक्षप्रमुख नसून ते माझ्यासाठी कुटुंबप्रमुख आहेत. मला मतदान करताना आपल्याला माझा पक्ष आडवा येत असेल तर तो माझा नाईलाज आहे. हा पक्ष किंबहुना हे शिवसेना नावाचे कुटुंब मी शेवटच्या श्वासापर्यंत कधीही सोडणार नाही. खाल्ल्या ताटात घाण करून मिळालेल्या विजयापेक्षा निष्ठेने मिळालेला पराभव हा कधीही श्रेष्ठ असतो. त्यामुळे गद्दारी करून मिळवलेल्या विजयापेक्षा पक्षाशी आणि नेत्याशी सदैव एकनिष्ठ राहून मिळालेला पराभव मला स्वीकार आहे, असे माजी आ. वैभव नाईक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

माजी आ. वैभव नाईक यांनी वैद्य सुविनय दामले यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपले दिनांक २३.११.२०२४ रोजीचे पत्र मिळाले. मी आमदारकीच्या कार्यकाळात केलेल्या कामांची आणि माझ्या समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची आपण आवर्जून जाणीव ठेवली, त्यासाठी आपले खरोखरच मनापासून आभार…! मला मत देताना तुम्हाला माझा पक्ष आडवा आला आणि त्यामुळे तुम्ही मला मतदान करू शकला नाहीत, असेही आपण आपल्या पत्रात म्हटले आहे. खरं तर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हा आपल्यासाठी एक राजकीय पक्ष असेलही पण माझ्यासाठी ते माझे कुटुंब आहे. उद्धवजी हे माझे फक्त पक्षप्रमुख नसून ते माझ्यासाठी कुटुंबप्रमुख आहेत. जर २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी माझ्यासारख्या एका ३४ वर्षाच्या तरुणाला राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांविरोधात कुडाळ-मालवण मतदारसंघाची उमेदवारीच दिली नसती तर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर माझा जन्म सुद्धा झाला नसता. माझा राजकीय प्रवास हा कणकवली नगरपंचायत क्षेत्रापुरता मर्यादित राहिला असता. त्या विधानसभा निवडणुकीत निकराची झुंज देऊनही माझा पराभव झाला तरीसुद्धा २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत उद्धवजीनी पुन्हा माझ्यावरच विश्वास दाखवला. त्यावेळी त्यांचा विश्वास सार्थ ठरवत मी महाराष्ट्राचा ‘जायंट किलर’ बनलो. माझ्या नावामागे ‘आमदार’ ही उपाधी लागली, ती उद्धव ठाकरे आणि शिवसेनेमुळेच…! मला दोन टर्म मिळालेल्या आमदारकीमध्ये तळागाळातील शिवसैनिकांनी मला निवडून आणण्यासाठी घेतलेले कठोर परिश्रम आहेत. त्यामुळे मला मतदान करताना आपल्याला माझा पक्ष आडवा येत असेल तर तो माझा नाईलाज आहे. हा पक्ष किंबहुना हे शिवसेना नावाचे कुटुंब मी शेवटच्या श्वासापर्यंत कधीही सोडणार नाही.

तुम्ही मला कर्णाची उपमा दिली आहे. कर्णाला युद्धाच्या निर्णायक क्षणी विद्येचे विस्मरण होईल हा शाप होता… रथाचे चाक युद्धभूमीवर अडकेल हा सुद्धा शाप होता… इंद्राने कपटकारस्थान करून कर्णाला जन्मतः मिळालेली कवचकुंडले काढून घेतली होती… अर्जुनाच्या रथाचे सारथ्य भगवान श्रीकृष्ण करीत होते आणि रथावर महाबली हनुमान विराजमान होते… आपल्या संभाव्य पराभवाची कर्णाला पूर्ण कल्पना होती तरीही तो रणांगणावर आपल्या प्रिय मित्रासाठी लढला आणि वीरगतीला प्राप्त झाला. कर्ण पहिला पांडव होता आणि त्यासाठीच श्रीकृष्णाने त्याला युधिष्ठिराऐवजी पुढचा सम्राट बनवण्याचे आमिष दाखवले होते. पृथ्वीतलावरील सर्वात देखणी स्त्री द्रौपदी त्याचा सहावा नवरा म्हणून स्वीकार करणार होती. तरीही कर्णाने हे सगळे मोह आणि आमिषे झुगारून दिली कारण त्याला ‘अंगराज कर्ण’ बनवणारा त्याचा मित्र होता. तो मित्र त्याच्या आयुष्यात आला नसता तर आयुष्यभर कर्णाची हेटाळणी ‘सुतपुत्र कर्ण’ म्हणूनच झाली असती. शिवसेनेतील फुटीनंतर टू थर्ड बहुमत गाठण्यासाठी एक-एक आमदार महत्वाचा बनला होता. त्यावेळी मला गुवाहाटीला जाण्यासाठी पन्नास कोटींची ऑफर होती. एकनाथ शिंदेंचे आणि माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे गुवाहाटी गाठल्यानंतर कदाचित माझा मंत्रीमंडळात प्रवेश सुद्धा झाला असता. मग काय माझ्या राजकीय स्वार्थासाठी मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी आणि मला निवडून देणाऱ्या जनतेशी बेईमानी करायची का…? कदापि नाही…! छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे ज्याप्रमाणे शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या राजाशी प्रामाणिक राहिले, त्यांचाच आदर्श आचरणात आणून उध्दवजींचा निष्ठावान शिवसैनिक म्हणून मी राजकारणात कार्यरत राहिन. सूर्याजी पिसाळ होण्यापेक्षा मी पावनखिंडीत प्राणांचे बलिदान देऊन आपल्या राजाला गडावर पोहोचवणारे बाजीप्रभू देशपांडे बनण्याचा प्रयत्न करीन. मी खंडोजी खोपडे होण्यापेक्षा ‘आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे’ सांगणारा तानाजी मालुसरे होईन. शेवटी इतिहास हा निष्ठावंतांचाच लिहिला जातो, गद्दारांचा नाही…!  ज्यांनी आपल्याला राजकीय अस्तित्व मिळवून दिले, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसून, त्यांच्या वाईट काळात त्यांना एकटे सोडून, स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायचा, ही गोष्टच माझ्या सदसद्विवेकबुद्धीला कधीही पटणारी नव्हती. खाल्ल्या ताटात घाण करून मिळालेल्या विजयापेक्षा निष्ठेने मिळालेला पराभव हा कधीही श्रेष्ठ असतो. त्यामुळे गद्दारी करून मिळवलेल्या विजयापेक्षा पक्षाशी आणि नेत्याशी सदैव एकनिष्ठ राहून मिळालेला पराभव मला स्वीकार आहे.

आपण आपल्या पत्रात लिहिले आहे की, जाज्वल्य हिंदुत्व जागरूक झाल्यामुळेच माझा पराभव झाला. कुडाळ-मालवण मतदारसंघातील ७३४८३ मतदारांनी माझ्यासाठी मतदान केले. हे सर्व मतदार मुस्लिम किंवा अल्पसंख्यांक होते, असे आपले म्हणणे आहे का…? की यातील हिंदू मतदारांचे हिंदुत्व आपल्याला मान्यच नाही…? मला एकच कळत नाहीये की तुमच्या जाज्वल्य हिंदुत्वाची नेमकी व्याख्या तरी काय…? उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत सत्ता स्थापन केली की त्यांचे हिंदुत्व बाटते. काय तर म्हणे की ते आता ‘जनाब उद्धव ठाकरे’ झाले आहेत. मात्र भाजपाने जम्मू काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती सोबत सत्ता स्थापन केली की तो पंतप्रधान मोदींचा मास्टरस्ट्रोक असतो. पंतप्रधान मोदी तिकडे पाकिस्तानच्या नवाज शरीफ सोबत बिर्याणी खाणार आणि इकडे त्यांचे भक्तगण इतरांना हिंदुत्व शिकवणार…! हीच बिर्याणी उद्धव ठाकरेंनी पाकिस्तानात जाऊन खाल्ली असती तर मोदीभक्त त्यांना एव्हाना ‘काफीर’ ठरवून मोकळे झाले असते. मात्र पंतप्रधान मोदी नवाज शरीफसोबत बिर्याणी खातात तेव्हा मात्र ती तथाकथित ‘डिनर डिप्लोमसी’ असते. देवेंद्र फडणवीस, आशिष  शेलार किंवा आजकाल स्वतःला हिंदूंचा गब्बर म्हणवणाऱ्या सगळ्या भाजप नेत्यांचे जाळीदार टोपी घालून इफ्तार पार्टीमधील किंवा नमाज पढतानाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. इतकेच कशाला कट्टर हिंदुत्ववादी ग्लोबल फेस असलेले नरेंद्र मोदी आणि त्यांचेच परमशिष्य योगी आदित्यनाथ दर्ग्यावर चादर चढवतानाचे फोटो सोशल मिडीयावर उपलब्ध आहेत. भक्तमंडळीनी उद्धव ठाकरेंचा अशा प्रकारे मुस्लिमांचे लांगुलचालन करतानाचा एक तरी फोटो शोधून दाखवावा. इतके सगळे डुप्लिकेट हिंदुत्ववादी नेते भाजपात उपलब्ध असताना भक्तमंडळी मात्र उद्धव ठाकरेंच्याच हिंदुत्वाला नाक मुरडून दाखवत आहेत. काय तर म्हणे महाराष्ट्रात ‘वोट जिहाद’ सुरू आहे. जर मुस्लिमांनी महाविकास आघाडीला मते दिल्यानंतर ‘वोट जिहाद’ होणार असेल तर पुण्यामध्ये ब्राम्हण समाजाची मते वर्षानुवर्षे फक्त भाजपालाच मिळतात तर तिथे नेमके काय सुरू आहे…? त्यासाठीच भाजपाला शेटजी-भटजींचा पक्ष म्हणतात. आज महाराष्ट्रात भाजपने सर्वत्र जातीय आणि धार्मिक विष पेरल्यामुळेच सगळीकडे मतांचे ध्रुवीकरण होत आहे. त्यासाठी कोणत्याही एका विशिष्ट समाजाला दोषी ठरवता येणार नाही.

सध्या केंद्रातील मोदी सरकारची परिस्थिती काय आहे…? पंतप्रधान मोदींचे सरकार हे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोघांच्या टेकूवर उभे आहे. मग नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंसोबत सरकार स्थापन करताना भाजपला हिंदुत्व आड येत नाही का…? भाजपने नितीश आणि चंद्राबाबू सोबत सत्ता स्थापन केल्यानंतर भाजप सेक्युलर झाली आहे की नितीश आणि चंद्राबाबू हिंदुत्ववादी झाले आहेत…? चंद्राबाबू नायडूंनी तर आपल्या जाहीरनाम्यात मुस्लिमांना सरसकट ५% टक्के आरक्षण देण्याची घोषणा सुद्धा केली आहे. मग अशा मुस्लीमप्रेमी नेत्यासोबत कट्टर हिंदुत्ववादी देवाधिदेव नरेंद्र मोदी सत्तेत का बसले आहेत…? हिंदुत्वाबाबत ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा’ अशीच समस्त भक्तमंडळीची भूमिका आहे का…? आम्हीसुद्धा नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंच्या पाठिंब्यावर पंतप्रधानपद उपभोगणाऱ्याना ‘जनाब नरेंद्र मोदी’ म्हटले तर चालेल का…? ‘हम करे तो रासलीला और आप करे तो कॅरॅक्टर ढिला’ अशीच काहीशी भाजपाची अवस्था झालेली आहे. अगदी महाराष्ट्रातही स्वतःला सेक्युलर म्हणवणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला हिंदुत्ववादी भाजपने आपल्या कडेवर घेतले. अलीकडेच पार पाडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ नाऱ्याला विरोध करताच तो नारा बदलून ‘एक है तो सेफ है’ केला. देशाच्या पंतप्रधानापासून भाजपचा तळागाळातला कार्यकर्ता राष्ट्रवादी कॉंग्रेसला भ्रष्टवादी म्हणवून हिणवत होता. पंतप्रधान मोदी एका सार्वजनिक कार्यक्रमात म्हणाले होते की, ७० हजार कोटींचे घोटाळे करणाऱ्या अजित पवारांना मी सोडणार नाही. त्यानंतर तीनच दिवसात अजित पवार आपला सगळा भ्रष्टवादी कंपू घेऊन भाजपसोबत सरकारमध्ये सामील झाले. त्याबरोबर दुसऱ्या दिवशी अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ ही सगळी टोळी सर्फ एक्सेलमध्ये धुतल्यासारखी पांढरीशुभ्र झाली. ही नेमकी काय भानगड आहे…? जर प्रश्न सत्ता बनवण्याचा असेल तर भाजपाला मुस्लिमधार्जिणे नेतेही चालतात आणि हजारो कोटींच्या घोटाळ्यात बरबटलेले भ्रष्टाचारीही चालतात. फक्त भाजपव्यतिरिक्त अन्य कोणत्याही हिंदुत्ववादी पक्षाने अशा प्रकारे भिन्न विचारसरणीच्या पक्षासोबत सत्ता स्थापन केली की हिंदुत्वाचा प्रश्न निर्माण होतो. भाजपने मेहबुबा मुफ्ती सोबत सत्ता स्थापन केली काय किंवा नितीश-चंद्राबाबू सोबत सत्ता स्थापन केली काय त्यावेळी भक्तमंडळीचे हिंदुत्व कधीही धोक्यात येत नाही. आपल्याच पक्षासोबत गद्दारी करणे आणि भ्रष्टाचाऱ्याना सोबत घेऊन सत्ता स्थापन करणे हे तुमच्या हिंदुत्वात बसत असेलही मात्र आमचे हिंदुत्व त्याला मान्यता देत नाही.

भाजप पक्षाच्या झेंड्यात भगव्या रंगाच्या शेजारी हिरवा रंग का आहे…? ही नेमकी कसली भेसळ आहे…? छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असे संबोधले जाते. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा झेंडा कसा होता…? संपुर्ण भगवा…! हिंदवी स्वराज्याचा हा भगवा झेंडाच ‘हिंदुत्वाची पताका’ म्हणुन ओळखली जाते. शिवसेनेने हीच हिंदुत्वाची पताका हाती घेतली आहे आणि म्हणूनच शिवसेनेचा झेंडा हा संपुर्ण भगवा आहे. भाजपचा झेंडा हा भेसळीचा आहे. त्यात भगव्या रंगाच्या शेजारी हिरव्या रंगाची भेसळ आहे. संपुर्ण भगवा झेंडा हा फक्त शिवसेनेचाच आहे आणि तो शिवसैनिकांच्याच हाती शोभून दिसतो. शिवाजी महाराजांच्या पवित्र भगव्या झेंड्यात हिरव्या रंगाची भेसळ करून ‘हिंदुत्व’ शब्द उच्चारताना भक्तमंडळींना जनाची नाही पण निदान मनाची तरी लाज वाटायला हवी. हिंदुत्वाचा जयजयकार करायचा असेल तर भाजपच्या कार्यकर्त्याँनी पक्षाच्या झेंड्यातील भगव्या रंगाशेजारील हिरवा रंग काढून दाखवावा. भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतेमंडळींकडे तशा प्रकारची मागणी देखील करावी. ‘आडवे आलात तर तुम्हाला ओलांडून अखंड हिंदुस्तान करून दाखवू’ अशा बाता मारण्याअगोदर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगून भाजपचा झेंड्यातील हिरव्या रंगाची भेसळ दुर करा. मग खुशाल अखंड हिंदुराष्ट्र करा….! त्यानिमित्ताने देशातील जनतेलाही कळेल की स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या प्रखर हिंदुत्ववादी नेते देवाधिदेव नरेंद्र मोदींची भाजपच्या झेंड्यातुन हिरवा रंग काढून टाकण्याची तयारी आहे का…? आणि भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग काढून टाकणे त्यांना शक्य होणार नसेल तर पुन्हा हिंदुत्व हा शब्द भक्तमंडळींनी चुकूनही तोंडातून उच्चारू नये…! भेसळीचे झेंडे हातात घेऊन हिंदुत्वाचा जयजयकार करता येत नाही. हिंदुत्वाचा जयजयकार करण्यासाठी शुद्ध भगवा ध्वज हाती घ्यावा लागतो…! जो शिवसैनिकांच्या हातात आहे…! भाजपचे हिंदुत्व बेगडी आहे हे देशातील जनतेला ज्ञात आहे. भाजप पक्षाच्या झेंड्यात भगव्याशेजारी असलेला हिरवा रंग हा त्या बेगडीपणाचा धडधडीत पुरावा आहे. त्यामुळे भाजपने हे बेगडी हिंदुत्व त्यांच्यापाशीच ठेवावे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शुद्ध भगवा झेंडा हाती घ्यायची हिंमत होत नसेल तर भाजपच्या नेत्यांनी आता हिंदुत्वाचे ढोल बडवणे कायमचे बंद करावे. अजून बऱ्याच गोष्टींवर मला भाष्य करायचे आहे. ते लवकरच पत्राच्या पुढच्या भागात करेन. तुर्तास इथेच थांबतो, असे या पत्रात म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3859

Leave a Reply

error: Content is protected !!