पर्यटन पाणबुडी प्रकल्प जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी दिशादर्शक ठरेल
पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांची प्रतिक्रिया
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन पाणबुडी प्रकल्पासाठी ४७ कोटी निधी उपलब्ध केल्याबद्दल पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे व केंद्रसरकारचे आभार व्यक्त केले आहे. या पर्यटन प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहा हजार पेक्षा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त होणार असून निवास व्यवस्थेमध्येही २० टक्के वाढ होणार आहे. अश्या प्रकारचा नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बारमाही पर्यटन वाढीसाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ प्रयत्नशील असून जिल्हाच्या पर्यटन वाढीचा उद्धेश ठेऊन पर्यटन व्यावसायिक महासंघाने पाणबुडी प्रकल्पासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या माध्यमातून राज्यस्तरावर बैठकही आयोजित करून या प्रकल्पाला निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न झाले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे या प्रकल्पासाठी मोठे योगदान आहे. खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, दीपक केसरकर यांच्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकार कडून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध झाला आहे. या पर्यटन पाणबुडीचे वैशिष्ट असे आहे की यामध्ये बसून सिंधुदुर्गातील खोल समुद्रातील अपरिचित सागरी विश्व पर्यटकाना पाहता येणार आहे. विविध प्रकारची कोरल, मासे जलसंपदा पर्यटक अनुभवणार असून सिंधुदुर्गातील जलपर्यटनाचा आलेख जागतिक पातळीवर उंचावणार आहे. चालू पर्यटन हंगामात ही पर्यटन पाणबुडी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती विष्णू मोंडकर यांनी दिली आहे .