गँगस्टर होतो, तर मग मुख्यमंत्री कसं केलं ? राणेंचा सवाल
संजय राऊत याना योग्यवेळी आणि योग्य रीतीने उत्तर देऊ
मुंबई : सामनाच्या अग्रलेखातून राणेंवर आगपाखड करत राणे एखाद्या छपरी गँगस्टारसारखेच वागत-बोलत असल्याची टीका करण्यात आली होती. त्याला नारायण राणेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. मी जर गँगस्टर होतो, तर शिवसेनेनं मला मंत्री का केलं?, मग शिवसेनेच मंत्री हे गँगस्टर आहेत काय ? असा सवाल राणेंनी पत्रकार परिषदेत केला आहे. संजय राऊत हा संपादक नाही. उद्धव ठाकरेंना जे आवडतं तेच तो लिहितो, असं सांगून त्याच्या वक्तव्यावर योग्यवेळी आणि योग्यरित्या त्याचं समाधान होईल, असं उत्तर देऊ, असे राणे म्हणालेत.
मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणेंनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. कोकणात जन आशीर्वाद यात्रा सूर असताना चिपळूणला मी आलो तेव्हा काहींनी भगवे झेंडे दाखवले. मी म्हटलं ठीक आहे भगवे झेंडे आहेत. येथे मोजून १७ माणसं होती. मी मुद्दाम मोजली. त्यापुढे आम्ही गेलो. तिथे एका कोपऱ्यामध्ये आवाज बाहेर येत नव्हते तरी काढत होते. तिकडे १३ माणसं होती. आमच्या घरावर किती आले ते मी मोजले नाहीत. पण पराक्रमी लोकांचे व्हिडीओ क्लीप लवकरच मिळतील. आम्ही तिघंही मुंबईत नव्हतो. पोलिसांनी जे करायचं ते केलं. तुम्हाला घरं नाहीत, मुलंबाळं नाहीत ? एवढंच आठवणीत ठेवा. तुम्ही कोणी मला काही करु शकत नाही. तुमच्या कुठल्याच प्रक्रियेला मी घाबरत नाही. शिवसेना वाढली त्यामध्ये माझा मोठा सहभाग आहे. त्यावेळी आताचे कुणी नव्हते. अपशब्द बोलणारेही नव्हते. कुठे होते तेही माहिती नाही. म्हणून त्यांना आंदोलन करायचं ते करु दे. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था पाहत राहावं, असा सल्ला राणे यांनी पोलिसांना दिला.
अनिल परबाना अटक होईपर्यंत सोडणार नाही
शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्या व्हिडीओ मध्ये राणेंच्या अटकेसाठी अनिल परब फोन वरूनपोलिसांवर दबाव टाकताना दिसून आले होते. या अनुषंगाने बोलताना नारायण राणेंनी अनिल परबाना अटक होईपर्यंत मी सोडणार नाही, असं म्हटलं आहे. याबाबत मी स्वतः न्यायालयात जाणार असल्याचे ते म्हणाले.