ठाकरे सरकार कुछ दिनो की मेहमान !
अटकेनंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत घायाळ राणेंचा सूचक इशारा
कुणाल मांजरेकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वापरल्यानंतर अटकेची कारवाई झालेल्या केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी कारवाईनंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना देशाचा स्वातंत्र्यदिन माहिती नसणे चुकीचे होते, ही बाब निदर्शनास आणून देणे आपला उद्देश होता. मात्र आपल्या वक्तव्याचा बाऊ करून अटक करण्यात आली आहे. मी बोललो तर तो गुन्हा, मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार प्रसाद लाड यांच्याबाबत केलेले वक्तव्य काय होते ? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बाबत बोललेले शब्द कोणते होते ? असे सवाल करून आपल्यावर कोर्टाची काही बंधने आहेत, त्यामुळे या संपूर्ण घडामोडींवर १७ सप्टेंबर नंतर अधिक भाष्य करेन, असे राणे म्हणाले. ठाकरे सरकार कुछ दिनोंकी मेहमान है… असा सूचक इशाराही राणेंनी दिला आहे.
केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी दुपारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. गेले काही दिवस माझी जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील सात वर्षात केलेली विकास कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कॅबिनेट मंत्री म्हणून माझ्यासह इतर काही नेत्यांना पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. त्यामुळे अधिवेशनानंतर स्वतःच्या राज्यात जाताना जनतेचा आशीर्वाद घेऊन कामकाज सुरू करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. त्यानुसार ही यात्रा सुरू असल्याचे राणेंनी सांगून परवापासून ही यात्रा सिंधुदुर्गातून पुन्हा सुरू होणार आहे. यात्रेत कोणत्याही प्रकारचा खंड पडणार नसल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. मी काय बोललो म्हणून राग आला ? भूतकाळात एखादी गोष्ट घडली, त्याची माहिती दिली म्हणून गुन्हा होतो का ? काही पत्रकारांनी या विधानाचा बाऊ केला. माझ्या ५२ वर्षांच्या राजकीय इतिहासात अशी पत्रकारिता मी पाहिली नसल्याचे सांगून राणेंनी खंत व्यक्त केली.
भाजपा आमदार राम कदम यांनी सेनाभवना बाबत वक्तव्य केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांचे थोबाड फोडा, असे आदेश उपस्थितांना केले होते. हा गुन्हा होत नाही का ? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीना चप्पलने मारले पाहिजे, असे बोलणे कोणत्या सुसंस्कृतपणा मध्ये बसते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बाबतही अशा प्रकारचे वक्तव्य सातत्याने झाले आहे. यालाच सज्जनपणा म्हणतात का ? याचे उत्तर पवार साहेबांनी द्यावे, असे सांगून एवढा सर्वगुणसंपन्न असलेला एक सज्जन मुख्यमंत्री पवार साहेबांनी खुर्चीवर बसवल्याचे ते म्हणाले. राज्यात आशीर्वाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सत्ताधार्यांच्या पोटात गोळा आल्याचे सांगून काहीही झाले तरी ही यात्रा खंडीत होणार नसल्याचे राणेंनी स्पष्ट केले आहे.