सर्जेकोट मध्ये आमदाराची मस्ती ; जास्त मस्ती केली तर जागच्या जागी बंदोबस्त करणार
निलेश राणेंचा इशारा : सत्तेच्या जीवावर ग्रामस्थांना दमदाटी आणि हुल्लडबाजी सुरू असल्याचा आरोप
मालवणचा पर्यटन महोत्सव शासनाच्या जीवावर ; महोत्सव कसा असतो ते पावसाळ्यानंतर दाखवून देऊ
कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्गनगरी : सर्जेकोट जेटीवर मच्छिमारांच्या होड्याना ये जा करण्यासाठी लँडिंग पॉईंट तयार करण्यात आला आहे. याठिकाणी होड्यांची वर्दळ जास्त असल्याने यालाच जोडून डबल लँडिंग पॉईंट तयार करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र या जागेला लागूनच असलेल्या एका शिवसेना पुढाऱ्याच्या जागेत भविष्यात उभारण्यात येणाऱ्या हॉटेलला त्रास होऊ नये म्हणून येथील लँडिंग पॉईंटवर दगड टाकून ठेवण्यात आले आहेत. आमदार वैभव नाईक सत्तेच्या जीवावर ही मस्ती करीत असून तुमच्या पुढाऱ्याला हॉटेल बांधायला तुम्ही ग्रामस्थांना वेठीस धरणार आहात का ? हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. कुडाळ, मालवण अगर सिंधुदुर्ग तुमच्या बापाचा माल आहे का ? सत्ता तुमची आहे म्हणून मस्ती चाललीय का ? आज येथील मच्छिमार भीतीच्या छायेत आहेत. ही मस्ती जिरवायला आम्हाला वेळ लागणार नाही. ती जिरवण्यासाठीच येत्या २५ मे नंतर सर्जेकोट जेट्टी नजीक ग्रामस्थांसह आम्ही बैठक लावली आहे. आमदाराने जास्त मस्ती केली तर जागच्या जागी बंदोबस्त करणार, असा इशारा भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी देत ही दमदाटी, हुल्लडबाजी इथे चालणार नाही. माणूसकी नसलेले आमदार, खासदार कुडाळ, मालवणचं काय भलं करणार ? असा सवाल केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, दादा साईल, दाजी सावजी, भाई मांजरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी निलेश राणे म्हणाले, १९९० ला राणेसाहेबानी बंधारा बांधून दिला. त्यानंतर दगड सुद्धा इथे पडला नाही. याठिकाणी शेकडो लोक धोक्यात असून येथील परिस्थितीचं गांभीर्य राणे साहेबांनी ओळखलं. आमदार, खासदार किंवा सत्ताधारी पक्षाचा कोणीही नेता याबाबत काही करणार नाही म्हणून राणेसाहेबानी एक कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. जिथे जिथे अडचणीचे पॉकेट आहेत, तेथे अग्रक्रमाने बंधारा बांधण्यासाठी म्हणून हा निधी राणेसाहेबांनी दिला. त्यानंतर ६ मे रोजी मी स्वतः मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यां समवेत पाहणी करून त्यांना जागा दाखवल्या होत्या. त्यानंतर ८ मे रोजी राणेसाहेबांच्या खासदार निधीच पत्र प्रशासनाला मिळालं. आज १७ तारीख आहे. पावसाळा कधीही सुरू होण्याची शक्यता असल्याने लोकांचे जीव धोक्यात आले आहेत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची आम्ही भेट घेतली. त्यांना या विषयाचे गांभीर्य सांगितलं. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी अवघ्या दोन मिनिटांत १ कोटींच्या खासदार निधीला आजच्या आज मान्यता देत असल्याचं सांगितल्याबद्दल निलेश राणे यांनी त्यांचे आभार मानले.
शिवसेनेचे देवबाग बंधाऱ्याचे अडीच कोटी हवेत विरले ?
राणेसाहेबांनी देवबाग बंधाऱ्यासाठी १ कोटी निधीची घोषणा केल्यानंतर वेगवेगळ्या पक्षांनी यावर राजकारण करायचा प्रयत्न केला. शिवसेनेने या बंधाऱ्यासाठी अडीच कोटीचा निधी देण्याची घोषणा केली. मात्र त्यांचे पैसे कधीच जमिनीवर उतरत नाहीत. पण राणेसाहेबानी जो शब्द दिला, त्याला १२ दिवसांच्या आत मान्यता मिळाली. यावरून राणेसाहेबांचे काम सर्वांसमोर आले आहे. शेकडो लोकांचे जीव वाचवण्याचे काम कोणी केलं असेल तर तो एकमेव नेता म्हणजे नारायण राणे, बाकी कोणात हिंमत नाही, दानत नाही. फक्त हवेत आकडे फुकायचे, जमिनीवर काहीच कधी उतरत नाही, असे सांगून उद्यापासूनच हे काम सुरू करायचा आमचा प्रयत्न असेल, असे निलेश राणे म्हणाले.
मालवणसह कुडाळ मध्ये पावसाळ्यानंतर पर्यटन महोत्सव
वैभव नाईकला गरीबी आली आहे. त्यामुळे मालवणचा पर्यटन महोत्सव शासनाच्या पैशातून करण्यात आला. यासाठी १८ लाख रुपये मंजूर करण्यात आले. या जिल्ह्यात स्वतःच्या पैशातून महोत्सव करणारा माणूस एकच, त्यांचं नाव म्हणजे नारायण राणे, असे निलेश राणे म्हणाले. शिवसेनेचे सर्व राजकारणी शासनाच्या पैशावरच अवलंबून आहेत, ते महोत्सव करण्यासाठी नव्हे तर स्वतःचं घर चालवण्यासाठी. यांची घरं सरकारच्या पैशावर चालतात म्हणून यांच्याकडून कसलीही अपेक्षा नाही. जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात सध्या कुडाळमध्ये घेण्यात येत असलेला कृषी मेळावा देखिल शासनाच्या पैशावर सुरू आहे. एवढी वर्ष जिल्हा परिषद चालवली आम्ही, अध्यक्ष आमचा, उपाध्यक्ष आमचा. यांनी प्रशासक देखील असे बसवलेत की यांना मजा मारायला सगळी सूट आहे. शासनाचे पैसे लुटण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यांना सूट दिली आहे, असे सांगून मालवण महोत्सवात कोण कलाकार आणले ? तमाशा वगैरे केले. त्या पलीकडे काय केलं ? महोत्सव करावा तो राणेंनीच ! पावसाळा जाऊ देत महोत्सव कसा करायचा तो आम्ही दाखवू. मालवणसह कुडाळ मध्ये भव्य दिव्य प्रमाणात पर्यटन महोत्सव आयोजित करणार, अशी घोषणा निलेश राणे यांनी केली.