या ठगांपासून वाचण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकमेव उपाय !
आ. नितेश राणेंची टीका ; मुख्यमंत्र्यांकडून गुंडाचा सत्कार झाल्याचा आरोप
कालचा गोंधळ म्हणजे पश्चिम बंगाल प्रमाणे राज्य पुरस्कृत हिंसा !
कुणाल मांजरेकर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर मंगळवारी राज्यात ठिकठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण झालेला पाहायला मिळाला. जुहू मध्ये राणे यांच्या निवासस्थानी शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. या धुमश्चक्रीमधील युवासेनेच्या कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावून सत्कार केल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्र्यां सारख्या घटनात्मक पदावर विराजमान असलेली व्यक्ती एखाद्या हिंसाचारास सहभागी असलेल्या व्यक्तींचा सत्कार कसा करू शकते ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
हाच धागा पकडून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी कालची घटना म्हणजे पश्चिम बंगाल प्रमाणे राज्य पुरस्कृत हिंसा असून मुख्यमंत्र्यांनी गुंडांचा सत्कार केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या ठगांपासून वाचण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकमेव उपाय असल्याचं देखील आ. राणेंनी म्हटलं आहे. नारायण राणे यांच्या जुहू येथील घरासमोर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचंड आंदोलन केलं होतं. त्यामुळे या परिसरात वातावरण तंग झालं होतं. त्यानंतर संध्याकाळी युवा सेनेचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते.
नितेश राणे यांनी हा फोटो ट्विट करत त्यावर भाष्य करताना हे विधान केलं आहे. याचा अर्थ पश्चिम बंगालप्रमाणे ही राज्य पुरस्कृत हिंसा होती. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी राज्याची सुरक्षितता सुनिश्चित केली पाहिजे. पण ते तर गुंडांचा सत्कार करताना दिसत आहेत. ही महाराष्ट्राची स्थिती आहे. त्यामुळे या ठगांपासून वाचण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.