नगरपालिकेच्या शतक महोत्सवात बिल्डरांकडून आणलेली रक्कम मंदार केणींकडून गिळंकृत
सुदेश आचरेकर यांचा गंभीर आरोप ; आम्ही आणलेली रक्कम नगराध्यक्षांच्या हस्ते पालिकेकडे केली सुपूर्द
“राजकीय कट्टा” ग्रुपवरून स्वपक्षीयांनीच “केसापासून नखापर्यंत” आणि “गालापासून लालीपर्यंत” धू धू धुतलेल्या केणींची आमच्या समोर उभं राहण्याची “पत” नाही
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण नगरपरिषदेच्या शतक महोत्सवात माझ्यासह दीपक पाटकर, उपनगराध्यक्ष राजू वराडकर, गणेश कुशे आदी नगरसेवकांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. अनेक व्यापारी, आमच्या मित्र परिवाराकडून खाजगीरित्या पैसे आणून ही सर्व रक्कम नगराध्यक्षांच्या दालनात पालिकेकडे सुपूर्द केली. मात्र मंदार केणी यांनी अनेक बिल्डरांकडून धन उकळून ते पैसे पालिकेत जमा न करता परस्पर गिळंकृत केले. याचे पुरावे आमच्याकडे असून “कोरल”, “समर्थ” अशी अनेक उदाहरणे आमच्याकडे आहेत, अशा शब्दांत माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्यावर पलटवार केला आहे. काही दिवसांपूर्वी “राजकिय कट्टा” ह्या व्हॉटसअप गृपवरून त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मंदार केणीना “केसापासून नखापर्यंत” आणि “गालापासून लालीपर्यंत” धू धू धुतले आहे. त्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्गात त्यांना तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. स्वतःची पत, प्रतिष्ठा ते गमावून बसले आहेत. त्यामुळे ज्यांना शहरात योग्यता, प्रतिष्ठा नाही, त्या मंदार केणींची आमच्या समोर उभे राहण्याची पत नाही, अशा शब्दांत सुदेश आचरेकर यांनी केणींना फटकारले आहे.
येथील भाजपा कार्यालयात सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मंदार केणींवर टीका केली. यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर, युवा शहरअध्यक्ष ललित चव्हाण, आबा हडकर, मोहन वराडकर, विलास मुणगेकर, बाळू मालवणकर आदी उपस्थित होते. यावेळी सुदेश आचरेकर यांनी मंदार केणींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. सायबा हॉटेल समोरील रेलिंगच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या एका कामासाठी दोन वेळा निविदा काढल्या गेल्या. यातील पहिली निविदा ४० ते ४५ लाखांची तर दुसरी निविदा २० लाखांची होती. प्रत्यक्षात हे काम २५ लाखांपेक्षा जास्त रकमेचे नाही. त्यामुळे या एका कामात २५ ते ३० लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा राजकीय कट्टा ग्रुपसह शहरात सर्वत्र आहे. तसेच हे काम सदोष असून पावसाळ्यामध्ये हे रेलिंग गंजून कोळंबच्या खाडीत पडणार आहे. सदरील काम करताना रस्त्याची रुंदी कमी केल्याने हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरल्याचे सांगून उद्या पावसाळ्यात हे रेलिंग खराब झाल्यानंतर ते भंगारात विकावे लागणार आणि हे भंगार विकायला देखील हीच मंडळी पुढे असणार असा आरोप सुदेश आचरेकर यांनी केला.
हिंमत असेल तर नारायण राणें सारखे महोत्सव करून दाखवा
नगरपालिकेच्या पैशावर डोळा ठेवून आणि अन जनतेच्या पैशाची लूट करुन कसले महोत्सव करता ? असा सवाल सुदेश आचरेकर यांनी उपस्थित केला आहे. हिंमत असेल तर केंद्रीय मंत्री नारायण राणे ज्याप्रमाणे सिनेस्टार आणि सेलिब्रिटींना आणून स्वखर्चाने सिंधु महोत्सव आणि बीच फेस्टिवल करत होते, तशा प्रकारचे महोत्सव शिवसेनेने करून दाखवावेत. राणेसाहेबांच्या नखाची सरही तुम्हाला येणार नाही. वैभव नाईक गेली दहा वर्ष येथे आमदार आहेत. पण स्वतःच्या पैशातून त्यांनी एक तरी पर्यटन महोत्सव साजरा केला का ? असा सवाल सुदेश आचरेकर यांनी केला.
वैभव नाईकांच्या ८ कोटीतले सांगाडेच आता शिल्लक
आमदार वैभव नाईक यांनी शहरात आठ कोटी रुपये आणल्याचे मंदार केणी सांगतात. पण या आठ कोटींचे केवळ सांगाडे शहरात उभे आहेत. यातील एकही विकास काम मार्गी लागलेले नाही. एसटी डेपोचे नूतनीकरण असो अथवा बसस्थानकातील मल्टीप्लेक्स सिनेमागृह अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. नगरपालिकेचे सुशोभीकरण, भाजी मंडई इमारत बांधकाम, फायर स्टेशन ही सर्व कामे आज अपूर्ण अवस्थेत उभी आहेत. नगरपालिकेच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली एका बिल्डरसाठी पालिकेच्या आवारातून रस्त्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. यासाठी नगरपालिकेचे उद्यान उध्वस्त करण्यात येत आहे. या उद्यानासाठी जमीन देणाऱ्या जोशी कुटुंबीयांनी याला आक्षेप घेतला असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून काम करण्यात येत आहे. स्वतःच्या फायद्यासाठी नगरपालिका विकण्याचे षड्यंत्र पालिकेच्या शंभर वर्षांच्या इतिहासात आताच्या सत्ताधाऱ्यांनी केल्याची टीका सुदेश आचरेकर यांनी करून या प्रकरणात कधीही संबंधित ठेकेदार आणि नगरपालिका प्रशासनावर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे ते म्हणाले. नगरपालिकेच्या विकास कामांची टेंडर यांच्या मर्जीतील ठेकेदारांना दिली असून त्यांनाही दुप्पट दराने वाळू, खडी यांच्या हितचिंतकांकडून घेण्याची सक्ती केली जात असल्याचे ते म्हणाले.
मंदार केणी आयत्या बिळावर नागोबा, शिवसैनिकांनी सावध व्हावे
शिवसेनेच्या जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या मेहनतीने आणि कष्टाने मालवणात संघटना उभी केली. परंतु सदैव दलबदलू म्हणून डिग्री घेतलेले मंदार केणी आज रेडीमेड शिवसेना हायजॅक करून आयत्या बिळावर नागोबा म्हणून बसले आहेत. त्यांना आता नगरपालिका आणि संपूर्ण शिवसेना गिळंकृत करायची आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वाने आतातरी या नागोबाला ओळखून ह्याच्या पासून सावध राहावे, अन्यथा शिवसेना संघटना हायजॅक करून हा माणूस केव्हा दुसरीकडे पळ काढेल, हे सांगता येत नाही असे सुदेश आचरेकर म्हणाले.
माझ्या प्रभागाची चिंता नको, मी समर्थ
मी जेवढी वर्ष नगरपालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे, तेवढ मंदार केणींचं वय नाही. मी प्रभागातील जनतेच्या सुखदुःखात नेहमी सहभागी असतो. ग्रासरूटला काम करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे सकाळी जोमात आणि रात्री कोमात असणाऱ्या मंदार केणी यांनी माझ्या प्रभागाची काळजी करू नये, असा सल्ला सुदेश आचरेकर यांनी दिला आहे.