“त्या” स्टॉलधारकांसाठी राष्ट्रवादी शहराध्यक्ष सतीश आचरेकर यांचा पुढाकार

बंदर जेटीवरील ‘स्टॉल हटाव’ कारवाई थांबवण्यासाठी व्यवसायिकांसोबत बंदर अधिकाऱ्यांची घेतली भेट

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण बंदर जेटी परिसरात हंगामी स्वरूपात स्टॉल उभारून गेली अनेक वर्षे पर्यटन पूरक व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना नोटिसा बजावत सुरू करण्यात आलेली ‘स्टॉल हटाव’ कारवाई प्रशासनाने तात्काळ थांबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरअध्यक्ष सतीश आचरेकर यांनी पुढाकार घेतला आहे. या पर्यटन हंगामात कोणत्याही पर्यटन व्यवसायिकांवर कारवाई करू नये, अशी आक्रमक भूमिका घेत श्री. आचरेकर यांनी या व्यावसायिकांसमवेत बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर यांची भेट घेत घेतली. येथील स्टॉल व्यवसायिकाना न्याय मिळावा ही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत आणि मालवण शहर अध्यक्ष म्हणून आपली भूमिका आहे. या विषयात राजकारण करण्याचा अथवा राजकारण आणण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही. अन्य पक्षही आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. येथील व्यावसायिकांना न्याय मिळणे महत्वाचे आहे, असेही सतीश आचरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

बंदर अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, सर्व स्टॉलधारक मालवण बंदर जेटी (सध्य स्थितीत जुनी बंदर जेटी) येथे गेली अनेक वर्षे पर्यटन आधारित व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहोत. अनेक ठिकाणाहून आलेल्या पर्यटकांनीही येथील सेवा व पर्यटन व्यवसायाबाबत नेहमीच समाधान तसेच कौतुक व्यक्त केले आहे. बंदर विभाग अथवा अन्य प्रशासन यांच्याकडून कोणतीही सूचना आल्यास त्याचेही पालन करून हंगामी स्वरूपात येथे व्यवसाय केला जातो. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे पर्यटन बंद होते. येथील व्यवसायही बंद होता. व्यवसायिकांपैकी अनेकांकडे अन्य कोणताही व्यवसाय नसल्याने मोठ्या आर्थिक संकटात हे व्यवसायिक सापडले. तोक्ते वादळातही अनेक व्यावसायिकांचे नुकसान झाले. मात्र या सर्वांवर मात करून पर्यटन व्यावसायिकांनी या पर्यटन हंगामात नव्याने व्यवसाय सुरू केला. काहींनी कर्ज काढून दागिने गहाण ठेवून पैसे उभे केले. पावसाळ्यापूर्वी पर्यटन हंगामाचा अखेरचा महिना (मे ) असताना व्यावसायिक यांचा व्यवसाय बंद झाल्यास मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हाच एकमेव व्यवसाय असल्याने या व्यवसायिकांचा सहानुभूती पूर्वक विचार होणे गरजेचे आहे. ‘दुकाने हटवा’ याबाबत आपण दिलेल्या नोटिसाचा सहानुभूती पूर्वक विचार करावा. पावसाळ्या पर्यत या पर्यटन हंगामात कोणतीही कारवाई करू नये. आम्ही जसे याआधी व्यावसायिकांनी आपल्याला सहकार्य केले तसे यापुढेही केले जाईल. तूर्तास ५ जून पर्यत दिलासा मिळावा, अशी भूमिका सतीश आचरेकर यांनी निवेदनातून मांडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व व्यावसायिकांच्या पाठीशी ठाम उभी राहील. स्थानिक व्यवसायिकांची रोजीरोटी आमच्यासाठी महत्वाची आहे. त्यामुळे यात कोणतेही राजकारण आम्हाला आणायचे नाही. या व्यवसायिकांना न्याय मिळवून दिला जाईल. येथील कारवाई निश्चित थांबेल. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत हे या प्रश्नी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करत असल्याचे सतीश सावंत यांनी माहिती देताना सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3607

Leave a Reply

error: Content is protected !!