केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून मालवण शहरात आजवर किती निधी आणलात ?
माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांचा सुदेश आचरेकर यांना सवाल
शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे आ. वैभव नाईक यांनी आणलेल्या ८ कोटीतूनच
आचरेकर यांच्या काळातील पर्यटन महोत्सवावेळी बिल्डर, उद्योजकांना आर्थिक भुर्दंड ; आमच्या महोत्सवाचा सामान्य जनतेवर “भार” नाही
कुणाल मांजरेकर
मालवण : शहरात गेल्या २० वर्षात निधी आला नाही, तेवढा गेल्या पाच वर्षात आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून शहरात निधी आला. त्यातून कोट्यवधींची कामे प्रगतीपथावर आहेत. याचाच पोटशूळ सुदेश आचरेकर यांना आहे. मात्र, आचरेकर ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचे नेते दिल्लीत केंद्रीयमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून आचरेकर यांनी शहरात किती निधी आणला हे जाहीर करावे, असे आव्हान माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी देतानाच “त्यांच्या” माध्यमातून एक रुपयाचा निधीही शहरात आला नसल्याने म्हटले आहे. आचरेकर यांच्या काळात झालेले महोत्सव हे शहरातील नागरिक, व्यापारी, उद्योजक, बिल्डर यांच्याकडून पैसे घेऊन करण्यात आले. पण आता पालिकेच्या वतीने होणाऱ्या महोत्सवाचा भार कोणत्याही बिल्डर, व्यापाऱ्यांवर टाकला जाणार नाही, अशा शब्दांत मंदार केणी यांनी सुदेश आचरेकर यांना टोला लगावला.
माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी केलेल्या आरोपावर माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी शिवसेना शाखेत पत्रकार घेत पलटवार केला आहे. यावेळी शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, यतीन खोत, महेश जावकर, तपस्वी मयेकर, मंदार ओरसकर, नरेश हुले, सिद्धेश मांजरेकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. केणी म्हणाले, गेल्या पाच वर्षात नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास केला. दोन वर्षांचा कोरोना काळ सोडला तर मालवण शहरातील इतर रस्ते पूर्ण होते. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुमारे ८ कोटी निधी आणला. त्याचे श्रेय वैभव नाईक यांनाच जातं. ही कामे निवडणुकीपूर्वी होतायत याची खंत आचरेकर यांना वाटते. व्यापारी अध्यक्ष यांनी फोडलेला नारळ, लोकांमधून होत असलेलं समाधान यातून आचरेकर यांना पोटशूळ उठला आहे. बीच फेस्टिव्हल जिल्हा नियोजन मधून व्हावा, जिल्ह्यात एक कॉमन सिंधू महोत्सव व्हावा अशी संकल्पना आमदार, खासदार, पालकमंत्री यांनी मांडली आहे.
काम न करता भुयारीच्या ठेकेदाराला पैसे देण्याची सुदेश आचरेकर यांची भूमिका
भुयारी गटार योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झालेले आहे ते आचरेकर यांनी स्वतःच कबुल केले. आता फक्त मशिनरी बसविणे हे २० टक्के काम शिल्लक आहे. या योजनेचे जे भाग पूर्ण आहेत या ठिकाणी छोट्या मशीनरी बसवाव्यात ही आमची आग्रही मागणी आहे. मशिनरी बसविल्याशिवाय ठेकेदाराचे पैसे देणार नाही. आचरेकर यांची काम न करता ठेकेदाराला बिल द्या ही भूमिका आमच्याकडून पूर्ण होणार नाही. त्यामुळे फक्त टीका करणाऱ्या आचरेकर यांची “मी नाही त्यातली कडी लावा आतली” अशी त्यांची परिस्थिती झाली आहे, असा टोला केणी यांनी लगावला आहे.
शहरात भरीव कामे, तौक्ते काळात मदत कार्यातही शिवसेना आघाडीवर
अग्नीशमन बंब बाबत महाराष्ट्राचे एक धोरण ठरलं आहे. आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटला आहे. मालवणचं फायर स्टेशन तयार झालेलं आहे. त्यामुळे आता आचरेकर यांना फायर फायटर वरून बोंब मारण्याची संधी मिळणार नाही. फायर स्टेशनचं काम तुमच्या काळात का नाही झाले. याचा खुलासा आचरेकर यांनी करावा. येत्या महिन्यात फायर स्टेशनचं काम पूर्ण होईल याचाही पोटशूळ आचरेकर यांना झालेला आहे. जिल्हा नियोजन मधून शहरात अनेक कामे मार्गी लागली आहेत. काही कामी प्रगतीपथावर आहेत. शहरात गेल्या २० वर्षात निधी आला नाही तेवढा निधी ५ वर्षात आला. हे अधिकारी सुद्धा कबूल करतात. आचरेकर यांच्या काळात अधिकारी, ठेकेदार, बिल्डर, घरगुती परवानगी यांना होणारा त्रास पाच वर्षात नागरिकांना झालेला नाही. आचरेकर यांच्या प्रभागातील रस्ते, विकासकामे ही पहिली असता या प्रभागाचा भकास कसा झाला हे दिसून आले. तेथील लोकांनी आमदारांना बोलवून विकासकामे झाली नाही म्हणून सांगितले. त्यानंतर आमदारांनी तात्काळ निधी दिला. त्यामुळे त्या प्रभागातील कामे लवकरात लवकर पूर्ण होतील. सत्ता ही लोकांवर अवलंबून असते. कोरोना, तौक्ते वादळात शिवसेनेन केलेली कामे, शिवसेनेचा असलेला संपर्क, आमदार वैभव नाईक यांनी केलेली मदत ही जनता विसरली नाही. मात्र, त्यावेळी विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी गायब होते. कोरोना काळात आमच्यावर टीका करत होते. तौक्ते वादळात काहीजण मुंबईत होते असा टोला मंदार केणी यांनी लगावला.