ब्राम्हण समाजासाठी सत्तेचा ‘रिमोट’ असलेल्या शरद पवारांकडे साकडे घाला
मनसेच्या वतीने अमित इब्रामपूरकर यांचा आ. वैभव नाईकांना सल्ला
ब्राम्हण समाजाच्या सहानुभूतीसाठी आ. मिटकरींनी माफी मागण्यासाठीची आमदारांकडून नौटंकी
मालवण : ब्राम्हण समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाची माफी मागून मनाचा मोठेपणा दाखवावा असे सांगणार्या आम.वैभव नाईक यांनी नौटंकी थांबवावी, असा सल्ला मनसेने दिला आहे. जिल्ह्यातील ब्राम्हण समाज अज्ञानी नाही. ब्राह्मण समाजाची सहानुभूती मिळण्यासाठीच आ. नाईक अशी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे आ. मिटकरी यांना सल्ले देण्यापेक्षा सत्तेचा रिमोट हातात असलेल्या शरद पवारांना त्यांची कानउघडणी करण्यासाठी सांगावे, असे मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, आ. मिटकरी यांनी इस्लामपूर येथे झालेल्या जाहीर सभेत हिंदू समाजाच्या चालीरीती आणि परंपरा यांची खिल्ली उडवली आहे. संस्कृत भाषेत चुकीच्या मंत्रोच्चाराचे पठण केले. त्यामुळे ब्राम्हण समाजात सर्वत्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. मिटकरी ही व्यक्ती राज्याचा जबाबदार आमदार असून, त्यांनी हिंदू समाजात पौरोहित्य करणाऱ्यांबाबत आणि विवाह परंपरेबाबत स्वतःला कुठलेही ज्ञान नसतांना चुकीचे विधान करून समाजाची खिल्ली उडवली आहे. त्यांनी अकारण जातीय तेढ निर्माण केली आहे. अशा प्रकारची कृती बालिश बुद्धीतून आणि अमानवीय आहे. याचा समस्त हिंदू बांधवांनी निषेध केला आहे.
आमदार अमोल मिटकरी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. सत्तेसाठी शिवसेना या पक्षाबरोबर युती केलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हातात सत्तेचा रिमोट कंट्रोल आहे. त्यामुळे आ. वैभव नाईकांनी आ. मिटकरीना ब्राम्हण समाजाची माफी मागण्याचा सल्ला देण्याची नौटंकी करण्यापेक्षा ब्राम्हण समाजाचा द्वेष करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि पुढे असे वक्तव्य न करण्याबाबत सत्तेचा रिमोट कंट्रोल असलेल्या शरद पवार यांना साकडे घालावे, असे अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.