महेश कांदळगावकर यांच्या मनधरणीसाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू
खा. विनायक राऊत, अरुण दुधवडकर, आ. वैभव नाईक यांनी केला संपर्क
आगामी पालिका निवडणूक कांदळगावकर यांच्याच नेतृत्वाखाली लढणार : आ. वैभव नाईक
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याने पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे. त्यामुळे या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने देखील सावध भूमिका घेत महेश कांदळगावकर यांची मनधरणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक यांनी श्री. कांदळगावकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून आपण मुंबईतून आल्यावर कांदळगावकर यांची भेट घेणार असल्याचे आ. नाईक यांनी म्हटले आहे. महेश कांदळगावकर आपला निर्णय मागे घेतील, असा विश्वास आ. नाईक यांनी व्यक्त करून आगामी मालवण नगरपालिका निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढणार असल्याची माहिती आ. नाईक यांनी दिली आहे.
मालवण नगरपालिकेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या शिवसेना सोडण्याच्या निर्णयानंतर मालवणातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कांदळगावकर यांनी निर्णय मागे घ्यावा यासाठी सर्व स्तरातून मनधरणी सुरू आहे. अनेक शिवसेना पदाधिकारी सर्वसामान्य, जेष्ठ नागरिकही त्यांच्याशी संपर्क साधत आहेत. मतपरिवर्तनासाठी त्यांच्यावर दबाव वाढत आहे. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनीही त्यांच्याशी फोनवर संपर्क साधत चर्चा केली. मुंबईवरून आल्यावर प्रत्यक्ष भेट घेऊन महेश कांदळगावकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे.
नगराध्यक्ष पदाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात महेश कांदळगावकर यांनी चांगले काम केले. जनहिताची अनेक विकासकामे त्यांच्या पुढाकारातून व सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने झाली. कोरोना काळात काही विकासकामाना ब्रेक लागला. मात्र आगामी काळात ती कामे जनहिताची अन्य नवी कामे केली जातील. आगामी नगरपालिका निवडणूक महेश कांदळगावकर यांच्या नेतृत्वाखाली लढवावी हा निर्णय पक्षाने यापूर्वीच घेतला आहे. हुशार, अभ्यासू व स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्त्व ही त्यांची ओळख त्यांनी कायम जपली. मालवण शहरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अनेक जेष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक यांनी संपर्क साधून महेश कांदळगावकर यांना मतपरिवर्तन करण्याबाबत सल्ला दिला आहे. मुंबईवरून आल्यावर दोन दिवसात मीही त्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
लोकशाहीत जनता सार्वभौम असते. अश्याच सर्वसामान्य जनतेतून मला अनेक फोन आले. ‘आमदार साहेब तुम्ही व वरिष्ठांनी यात लक्ष घाला महेश कांदळगावकर यांचे मतपरिवर्तन करा’. या मालवण शहरातील जनतेच्या प्रतिक्रिया व महेश कांदळगावकर यांच्याबद्दल असलेला आदर निश्चितच आम्हालाही अभिमानास्पद आहे, असेही आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे.
मतपरिवर्तन होईल : आमदार वैभव नाईक
खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनीही या विषयात लक्ष घातले आहे. खासदार यांनी महेश कांदळगावकर यांच्याशी चर्चा केली आहे. पक्षस्तरावर कोणतेही विषय असल्यास त्याबाबतही शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर हे निर्णय घेतील. महेश कांदळगावकर यांचे मतपरिवर्तन निश्चित होईल. असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे.