किल्ले सिंधुदुर्गच्या ३५६ व्या वर्धापन दिनी महाराणी ताराबाईंच्या ऐतिहासिक योगदानाला उजाळा
किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने वर्धापन दिन साजरा : इतिहास संशोधक ज्योती तोरसकर यांनी उलगडला इतिहास
कुणाल मांजरेकर
मालवण : किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्याचा ३५६ वा वर्धापन दिन शनिवारी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महाराणी ताराबाई यांचे सिंधुदुर्ग किल्ल्यासाठीचे योगदान यांवर इतिहास संशोधक सौ. ज्योती तोरसकर यांनी विस्तृत मार्गदर्शन करताना इतिहासाला उजाळा दिला.
सकाळी आठ वाजता श्री मोरयाचा धोंडा येथे प्रभारी प्राचार्य रामचंद्र काटकर यांच्या हस्ते श्री गणेश पूजा करून आणि सागराला श्रीफळ अर्पण करून प्रेरणोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी किरण आपटे यांनी पौरोहित्य केले. सकाळी १० वाजता सिंधुदुर्ग किल्ल्यावर श्री शिवराजेश्वर मंदिरात शिवरायांची पूजा करून आणि शिवप्रार्थना म्हणून कार्यक्रमास सुरुवात झाली . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवरायांची अस्मिता असणारे गडकोट किल्ले यांची स्वच्छता मोहीम राबवली अशा स्वयंसेवी संस्थेना यावेळी शाल, श्रीफळ देऊन सत्काररुपी मानाचा मुजरा करण्यात आला. यावेळी जनसेवा प्रतिष्ठान वेंगुर्ला, स्वराज्य कार्य टिम निवती गड वेंगुर्ले, स्वराज वस्तीस्थ संघ बचत गट रेवतळे, लायन्स क्लब मालवण यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रेरणोत्सव समितीच्या उपाध्यक्ष सौ. ज्योती तोरसकर यांचे सिंधुदुर्ग किल्ल्यावर वास्तव्यात असणाऱ्या ताराराणी व सिंधुदुर्ग किल्ला या विषयावर व्याख्यान झाले. ताराराणी यांचा इतिहास अधोरेखित करताना ताराराणी या सिंधुदुर्ग किल्ल्यावर तीन वर्ष राहिल्या होत्या. या तीन वर्षांमध्ये ताराराणीने स्वराज्याच्या देखभालीसाठी आवश्यक असणारे प्रयत्न कशाप्रकारे केले, सिंधुदुर्ग किल्ल्यावरून यशवंत गड जिंकण्याची केलेली मोहीम . त्याचबरोबर स्वराज्याची गादी आपल्याकडेच कशी राहिली पाहिजे, यासाठी सिंधुदुर्ग किल्ल्यातून केलेले प्रयत्न अशा प्रकारचे विविध इतिहासाचे कंगोरे सर्वांसमोर मांडले. यावेळी प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, विजय केनवडेकर, हेमंत वालकर, गणेश कुशे, भाऊ सामंत, दत्ता नेरकर, प्रदिप वेंगुर्लेकर, डॉ. संजीव लिंगवत, आशिष राऊळ, सौ. संजना मांजरेकर, प्राची फाटक, कल्पना शिरोडकर, रश्मी सारंग, प्रतिज्ञा राऊत, विषाखा मांजरेकर, मिहिका केनवडेकर रत्नाकर कोळंबकर, लक्ष्मीकांत कांबळी आदी उपस्थित होते.