आनंद मिराशी मृत्यू प्रकरणात कंत्राटी वीज कामगार संघटना पुन्हा आक्रमक
आठ दिवस उलटून गेले तरी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही ?
अशोक सावंत यांचा संतप्त सवाल ; मृत आनंद मिराशीला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
मालवण : महावितरणचे आचरा येथील कंत्राटी कर्मचारी आनंद मिराशी यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या वीज वितरणच्या अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे कंत्राटी वीज कर्मचारी संघटनेने पून्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. संघटनेचे नेते अशोक सावंत यांनी शनिवारी आचरा पोलीस ठाण्यात धडक देऊन या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होऊन आनंद मिराशीला नाय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अशोक सावंत यांनी दिला आहे.
मालवण तालुक्यातील आचरा येथील महावितरणचे कंत्राटी कर्मचारी आनंद मिराशी हे शनिवार ९ एप्रिल रोजी शॉक लागून विद्युत खांबावरुन खाली कोसळून जखमी झाले होते. त्यांना कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कंत्राटी वीज कर्मचारी संघटना आक्रमक झाली. संघटनेचे नेते अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर त्या अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. मात्र, अद्यापही त्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला नाही आणि आनंद मिराशी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही मिळाली नाही. आज महावितरणचे कंत्राटी कर्मचारी संघटनेचे नेते अशोक सावंत आणि कर्मचाऱ्यांनी आनंद मिराशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. त्यानंतर आचरा पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी आचरा माजी सरपंच अशोक गावकर, विज वितरण कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद लाड, विठ्ठल सलकार, शुभम मुणगेकर, महेश राऊल, सागर गावठे, संजय गोवेकर, राजन गवकर, संदीप पांगम, बाबूराव मिराशी, सुभाष मिराशी, विजया तोरणकर, प्रज्ञा सावंत, कृष्णा मिराशी आदी उपस्थित होते.
आनंद मिराशी यांचा मृत्यू होऊन आज ७ दिवस झाले. आनंद याला विद्युत खांबावर चढण्याचा अधिकार नाही. असे असताना त्याला खांबावर चढविण्यात आले. वीज वितरणचे सहायक अभियंता संतोष सरवले यांनी आनंद याला फोन करून विद्युत खांबावर चढण्यास सांगितले. त्याच्याबरोबर एकही वीज वितरणचा कर्मचारी नव्हता. आनंद याच्या मृत्यूस हे अधिकारीच जबाबदार आहेत असा आरोप करत आमच्याकडे तसा पुरावा असल्याचे आनंद यांच्या नातेवाईकांनी सांगितले. आनंद यांचा मृत्यू होऊन आज सात दिवस झाले. मात्र, अद्यापही त्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले नाहीत. पंचयादी घालण्यात आली नाही. आनंद यांच्या घरची परिस्थिती बेताची आहे. त्याच्या पगारावर त्याचे कुटुंब चालत होते. आता त्या कुटुंबियांची जबाबदारी कोण घेणार ? सहायक अभियंता संतोष सरवले यांनी स्वतःच्या घरातली वीज गेल्याने त्याला पहाटे बोलवून घेतले असा आरोप सावंत यांनी केला. या घटनेबाबत आमदार नितेश राणे यांनी स्वतः पोलीस अधिक्षकांशी चर्चा केली आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. त्यामुळे यामध्ये जबाबदार असणाऱ्या सहायक अभियंता संतोष सरवले आणि वायरमन जांभळे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आनंद मिराशी याला न्याय मिळेपर्यंत आवाज उठवत राहणार. त्यांच्यावर योग्य कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अशोक सावंत यांनी दिला.