मालवण पं. स. चा देशपातळीवर डंका ; हे यश तर राणेसाहेबांच्या भक्कम पाठींब्यामुळेच !
माजी सभापती अजिंक्य पाताडे, माजी उपसभापती राजू परुळेकर यांची प्रतिक्रिया
पं. स. ला केंद्रशासनाचा पंडित दीनदयाळ पंचायत सशक्तीकरण पुरस्कार जाहीर
देश पातळीवरील सन्मान मिळवणारी जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण पंचायत समितीला केंद्र शासनाचा पंडित दीनदयाळ पंचायत सशक्तीकरण पुरस्कार जाहीर झाला आहे. विविध नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच जनहिताच्या कामकाजामुळे पंचायत समितीने देशपातळीवर आपला झेंडा फडकवला असून देश पातळीवरील सन्मान मिळवणारी मालवण पं. स. जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती ठरली आहे. मालवण पंचायत समितीला २५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे, अशी माहिती माजी सभापती अजिंक्य पाताडे आणि माजी उपसभापती सतीश उर्फ राजू परुळेकर यांनी देतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी वेळोवेळी केलेल्या सूचना तसेच केलेली सर्वतोपरी मदत यामुळेच मालवण पं. स. ला हे यश मिळवणे शक्य झाल्याचे म्हटले आहे.
हे श्रेय तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, जनता, पदाधिकारी, कर्मचारी तसेच सहकारी गटनेते सुनील घाडीगावकर, सर्व सदस्य तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांचेही असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. आता देशपातळीवर अव्वल क्रमांक पटकविण्यासाठी पंचायत समितीने कंबर कसली आहे. सध्या पंचायत समितीवर प्रशासक असले तरी आपला तालुका म्हणून आम्ही सर्व माजी पदाधिकारी पुढील लक्ष्य गाठण्यासाठी लक्ष देणार असल्याचे माजी सभापती अजिंक्य पाताडे यांनी म्हटले आहे. मालवण पंचायत समितीच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.