आ. वैभव नाईकांच्या पुढाकाराने अनेकांच्या नजरेला नवसंजीवनी ; डॉ. तात्याराव लहाने यांचे गौरवोद्गार
दोन दिवसांत ३०७ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया ; असा आमदार मिळणे येथील जनतेचे भाग्यच : डॉ. लहाने
सिंधुदुर्ग : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस येथे आयोजित केलेल्या भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरात शुक्रवारी १७० तर शनिवारी १३७ जणांवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. शुक्रवारी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना आज डिचार्ज देण्यात आला. प्रसिद्ध नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत जे. जे. हॉस्पिटल मुंबईच्या नेत्र शल्य चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. राघिनी पारेख यांच्यासह इतर ४२ जणांच्या टीम कडून या बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. खेड्यापाड्यातून आलेल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आमदार वैभव नाईक यांनी स्वतः याठिकाणी उपस्थित राहून रुग्णांना जेवण, राहण्यासाठी योग्य नियोजन केले.
यावेळी डॉ. लहाने म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब लोकांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी १ वर्ष अगोदर आमदार वैभव नाईक यांनी विनंती केली होती. आ. नाईक यांची काम करण्याची पद्धत चांगली आहे. प्रत्येक व्यक्तीला आई, वडील, भाऊ, बहीण मानून त्यांच्या हिताच्या दृष्टीने ते काम करतात. आ. वैभव नाईक यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात सर्वात चांगली बिनटाक्याची शस्त्रक्रिया आमच्या माध्यमातून घडविण्यात आली. अनेकांच्या नजरेला या शिबिरामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. असे आमदार तुम्हाला मिळाले हे तुमचे भाग्य आहे, असे गौरवोद्गार डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले. तसेच शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींनी पुढील काळात घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन त्यांनी केले.
यावेळी आ.वैभव नाईक म्हणाले, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी दीड लाखापेक्षा जास्त डोळ्यांचे ऑप्रेशन केले आहेत. त्यांच्याकडून ऑपरेशन करून घेण्यासाठी लोक धडपडत असतात. मग त्यात आमदार, खासदार वा सर्वसामान्य व्यक्ती यांचा समावेश असतो. त्यांनी आपल्या बिझी शेड्युल मधून वेळ काढत माझ्या विनंतीला मान देऊन सिंधुदुर्गात शिबिर घेतले. जवळपास १६ ते १७ तास त्यांनी या शिबिरात काम केले. शिबिरात अनेक रुग्ण असे होते कि ज्यांचे कधी ऑपरेशन होणार नव्हते. परंतु डॉ. तात्याराव लहाने शिबिरात शस्त्रक्रिया करणार ऐकून ऑपरेशन करण्यास नातेवाईक व ते व्यक्ती तयार झाले. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी हे शिबीर यशस्वी केले. प्रत्येक रुग्णाची सेवा करण्यासाठी जे. जे. हॉस्पिटल मुंबईच्या नेत्र शल्य चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. राघिनी पारेख यांच्यासह इतर ४२ जणांच्या टीमने उत्तम काम करत आहे. त्याचबरोबर सिंधदुर्गचे सिव्हील सर्जन, वैद्यकीय महाविद्यालयाचे डिन, त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयाचे व वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर, नर्स व संपूर्ण स्टाफ यांचेही मोलाचे सहकार्य शिबिराला लाभले. याबद्दल सर्वांचे आमदार वैभव नाईक यांनी आभार मानले. व दरवर्षी असे शिबीर घेणार असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. राघिनी पारेख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, डॉ. गावकर, डॉ. जोशी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका संघटक बबन बोभाटे, उपसभापती जयभारत पालव, राजू गवंडे, नागेश ओरोसकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.