मोठी बातमी : शिवसेना नेते संजय राऊतांवर “ईडी”ची कारवाई
माझं राहतं घर जप्त केलं, त्याचा भाजप कडून आसुरी आनंद : राऊतांची प्रतिक्रिया
मुंबईः केंद्रातील भाजपा सरकारसह ईडी, सीबीआयवर सातत्याने टीका करणाऱ्या शिवसेना खासदार तथा सामनाचे संपादक संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती ईडी कडून जप्त करण्यात आली आहे. त्यात अलिबागमधील जमिनीचे आठ तुकडे, दादरमधील एक फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याचे समजते.
पत्राचाळ घोटाळ्यातील पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरली म्हणून ही कारवाई केली असून, श्रीधर पाटणकर यांच्यानंतर शिवसेनेच्या आणखी एका मोठ्या नेत्यावर ईडीने ही कारवाई केली आहे. भाजपा आणि शिवसेनेतील वाद आणखी विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, अलिबाग मधील माझी जमीन पत्नी आणि नातेवाईकांनी मेहनतीने खरेदी केली असून माझं मुंबईतील राहतं घर देखील जप्त करण्यात आलं आहे. मात्र याचा भाजपच्या नेत्यांकडून आसुरी आनंद घेतला जात आहे. आजच्या कारवाईनंतर लढण्याची नवीन प्रेरणा मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.