कुंभारमाठ मधील “त्या” बोगस कामाचा ग्रामस्थांनी केला “पर्दाफाश”

डांबराचा थांगपत्ताच नाही ; ग्रामस्थ आक्रमक होताच अधिकारी नरमले

बोगस कामाची दिली कबुली ; खडी काढून पुन्हा नव्याने खडीकरण करून देण्याची ग्वाही

कुणाल मांजरेकर

मालवण : कुंभारमाठ हुतात्मा स्मारकानजिक सुरू असलेल्या रस्त्याच्या बोगस कामाचा ग्रामस्थांनी पर्दाफाश केला आहे. या रस्त्यावर डांबर न टाकताच खडीकरण होत असल्याचे निदर्शनास येताच संतप्त ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले. यावेळी जि. प. बांधकामच्या अधिकाऱ्यांनी येथे येऊन हे काम सदोष असल्याचे मान्य करीत ही खडी काढून पुन्हा खडीकरण करून देण्याचे मान्य केले.

कसाल मालवण मुख्य रस्ता ते हुतात्मा स्मारक पर्यत जाणारा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त बनला आहे. या रस्त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून १० लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी भूमिपूजन झालेल्या या रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचे दाखवून देत ग्रामस्थांनी मंगळवारी या रस्ता कामाची पोलखोल केली. या रस्त्याचे काम करताना डांबराचा वापर न करता तसेच रस्त्यावरील माती कचरा बाजूला न करता खडी पसरवून काम सुरू होते. याबाबत माहिती मिळताच भाजपचे युवा नेते मंदार लुडबे, माजी उपसरपंच ग्रा.प. सदस्य मनोज वाटेगावकर, प्रसाद परुळेकर, मयुर कदम, सागर वाटेगावकर, दिलीप सांगवेकर, सुनील मालवणकर, वस्त व ग्रामस्थांनी या ठिकाणी येत काम थांबवले. यावेळी पसरलेली खडी कामगारांना काढण्यास सांगितले असता खाली डांबर नसल्याचे स्पष्ट झाले. मातीही बाजूला केली नव्हती. काम थांबवून माती बाजूला करत त्यांनंतर रस्त्यावर योग्य प्रमाणात डांबर घालून पुन्हा खडीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी उपस्थित जि. प. बांधकामच्या अधिकारी यांनी हे खडीकरण पुन्हा करण्याची ग्वाही दिली. त्यानुसार आज ही खडी बाजूला करून उद्या नव्याने खडीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!