रोहीत स्पोर्ट्स वेंगुर्ले ठरला “निलेश राणे चषक २०२२” चा मानकरी

महालक्ष्मी देवबाग संघ ठरला उपविजेता ; विजेत्या संघाला तीन लाख तर उपविजेत्या संघाला दीड लाखांचे पारितोषिक

विजेत्या संघाला विनायक परब, हितेश चव्हाण तर उपविजेत्या संघाला अशोक सावंत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

कुणाल मांजरेकर

मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डींग मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या “डे नाईट” निलेश राणे चषक २०२२ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच्या अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले संघाने महालक्ष्मी देवबाग संघाचा पराभव करीत प्रतिष्ठेच्या निलेश राणे चषकावर नाव कोरले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.

माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त २३ ते २६ मार्चपर्यंत येथील बोर्डींग मैदानावर ‘निलेश राणे चषक २०२२” ही राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विजेत्या संघाला ३ लाख तर उपविजेत्या संघाला दीड लाख रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आल्याने ही स्पर्धा प्रतिष्ठेची ठरली होती.

या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दानिश इलेव्हन देवबाग संघाने नाणेफेक जिंकून रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. यावेळी रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले संघाने निर्धारित ६ षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात ७० धावा जमवल्या. याचा पाठलाग करताना दानिश इलेव्हन संघ ६ षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात ५७ धावाच जमवू शकला. त्यामुळे रोहित स्पोर्ट्स संघाने या उपांत्य सामन्यात १३ धावांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरा उपांत्य फेरीचा सामना महालक्ष्मी देवबाग विरुद्ध राजाराम वॉरियर्स यांच्यात झाला. यामध्ये देवबाग संघाने जिंकून राजाराम वॉरियर्स संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी राजाराम वॉरियर्सचा संघ ६ षटकात २ गड्यांच्या मोबदल्यात ४१ धावा जमवू शकला. या धावसंख्येचा पाठलाग करताना महालक्ष्मी देवबाग संघाने ४.३ षटकात २ गड्यांच्या मोबदल्यात ४२ धावा जमवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

उपविजेत्या महालक्ष्मी देवबाग संघाला भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

अंतिम सामन्यात रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. यावेळी महालक्ष्मी देवबाग संघाला ८ षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात ६३ धावाच जमवल्या आल्या. अंतिम विजेतेपदासाठी ८ षटकात ६४ धावांचे उद्दिष्ट घेऊन मैदानात उतरलेल्या रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले संघालाही महालक्ष्मी देवबाग संघाने विजयासाठी शेवटच्या षटकापर्यंत रोखून धरले. शेवटच्या ६ चेंडूत विजयासाठी ९ धावांची आवश्यकता असताना रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले संघाने ३ चेंडू राखत ५ गड्यांच्या मोबदल्यात ६४ धावांचे विजयी लक्ष गाठत निलेश राणे चषकावर आपले नाव कोरले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, स्पर्धाप्रमुख तथा जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, माजी सभापती अजिंक्य पाताडे, उद्योजक महेन ढोलम, सुशील कारखानीस, अभी गावडे, आप्पा लुडबे, राजू वडवलकर, उमेश राऊत, विनायक परब, हितेश चव्हाण, प्रकाश बुचके, आप्पा परब यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी अखेरच्या दिवशी स्पर्धेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

विजेत्या रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले संघाला विनायक परब, हितेश चव्हाण यांच्या हस्ते ३ लाख रुपये रोख पारितोषिक आणि आकर्षक निलेश राणे चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तर उपविजेत्या महालक्ष्मी देवबाग संघाला भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांच्या हस्ते दीड लाख रुपये रोख आणि आकर्षक निलेश राणे चषक देण्यात आला. या स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून अजित मोहिते, उत्कृष्ट गोलंदाज विजय पावले, उत्कृष्ट फलंदाज प्रथमेश पवार, मालिकावीर करण मोरे यांना रोख पारितोषिके, चषक आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढतीत पराभूत संघ दानिश इलेव्हन देवबाग आणि राजाराम वॉरियर्स तळवडे यांना १० हजार रुपये रोख आणि चषक देण्यात आला. तर अंतिम सामनावीर म्हणून प्रज्योत याला सन्मानित करण्यात आले. पारितोषिक वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन अजय शिंदे यांनी केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!