पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सोमवारी २८ मार्च रोजी मालवणात
पर्यटन विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लागणार : आ. वैभव नाईक यांचा विश्वास
मालवण : राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सोमवारी २८ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता मालवणात येत आहेत. पर्यटन मंत्र्यांच्या या मालवण भेटीत अनेक पर्यटन विकासाचे प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. त्यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पर्यटन विकासासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली असून सुमारे २५ कोटींची कामे नजीकच्या काळात मार्गी लागतील. तशा प्रकारचा हिरवा कंदील शासनाच्या हाय पॉवर कमिटीने दिल्याचेही ते म्हणाले.
येथील शिवसेना शाखेत आ. नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे सोमवारी जिल्हा दौऱ्यावर येत असून ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे इथल्या पर्यटनाला वाव मिळणार आहे. कोकणात विशेषतः सिंधुदुर्गात पर्यटनातून काय काय करता येईल याचा विचार आणि आढावा ना. ठाकरे हे या दौऱ्यात घेतील. तसेच गेले तीन चार वर्षे सीआरझेड कायद्यामुळे रखडलेली मेढा राजकोट जेटी संदर्भातही एक आश्वासक पाऊल उचलले जाईल. छत्रपतींचा सिंधुदुर्ग किल्ला हा विद्युत प्रकाश झोताने उजळून टाकण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार असून एलईडी दिव्यांद्वारे किल्ल्याचे सुशोभीकरण केले जाईल. तसेच तारकर्ली येथे गार्डन होण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत. मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा होण्यासाठी मेरिटाईम बोर्डाने दोन जागा सुचवल्या आहेत. याबाबत निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल. असे सांगून देवबाग आणि मालवण शहरामध्ये बंधारे होण्यासाठी प्रयत्न केले जातील. येथील गडकिल्ल्यांबाबत पर्यटनाच्या दृष्टीने काय करता येईल याविषयी विचार विनिमय करण्यात येणार असून मालवण शहरात पर्यटकांना आकर्षित करणारे गझिबो उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील. एकूणच मालवणच्या पर्यटन विकासासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचा पुरेपूर उपयोग केला जाईल, असे आ. नाईक म्हणाले.