थकीत करवसुलीसाठी मालवणात नगरपालिका “ॲक्शन” मोडमध्ये !

कर थकबाकीदाराना दणका ; गुरुवारी २४ मालमत्ता सील, २०० जणांना नोटीसा

मालवण : मालवण शहरामध्ये मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर व पाणीपट्टी कर थकवल्याने त्यांच्या मालमत्तेवर मालवण नगरपरिषदेमार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. काही मालमत्ता सील सुद्धा करण्यात आल्याचे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मालवण नगरपरिषदेच्या घरपट्टी व पाणीपट्टी विभागाकडून १० हजारहून अधिकचा कर थकविणाऱ्या २०० मालमत्ता धारकांना मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत हा कर न भरल्यास मालमत्ता जप्त करणार असल्याच्या आशयाच्या नोटीसा संबंधित थकबाकीदारांना देण्यात आल्या होत्या. थकीत मालमत्ता सिल करण्यासाठी मालवण नगरपरिषदेने जप्ती पथक तयार केले आहे. आज गुरुवारी मालवण शहरातील निर्माण रेसिडन्सी मधील चार मालमत्ता तसेच शहरातील वर्षानुवर्षे थकीत कर असलेल्या वीस मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. ही कारवाई मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथक प्रमुख करनिरिक्षक गितांजली नाईक, लिपिक विजय रावले, राजा केरीपाळे, बस्त्याव फर्नाडीस, सुनिल चव्हाण, सुभाष कुमठेकर यांच्या पथकाने केली आहे. ही कारवाई सुरुच राहणार असून मालमत्ता व पाणीपट्टी कर थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकाकडे जाऊन तो कर भरुन घेण्यासाठी नगरपरिषदेमार्फत कर भरणा मोहिम सुरु आहे. मालवण नगरपरिषदेमार्फत चार वसुली पथक तयार केले असून ही फिरती पथके थकबाकीदारांपर्यंत पोहचून त्यांच्याकडून कर वसुली करुन घेत आहेत. उर्वरित कर जमा करण्यासाठी नगरपरिषदेने विशेष मोहिम हाती घेतली आहे. मालमत्ता कर व पाणीपट्टी कर थकबाकी ठेवलेल्या थकबाकीदारांची नावे वृत्तपत्र व इतर माध्यमातून जाहिर करण्यात येणार आहेत, असे मालवण नगरपरिषदेच्या कर विभागातर्फे सांगण्या‍त आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!