निलेश राणे चषक २०२२ : दानिश इलेव्हनची उपांत्य फेरीत धडक

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांसह मान्यवरांची भेट ; आयोजनाचे कौतुक

कुणाल मांजरेकर

मालवण : बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डींग मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या “निलेश राणे चषक” या राष्ट्रीय स्तरावरील खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यांमधून दानिश इलेव्हन देवबाग संघाने उपांत्य फेरीत धडक मारली.

बुधवारी पहिल्या दिवशी फ्रेंडशिप चेंदवण विरुद्ध साई स्पोर्ट्स हुमरठ यांच्यातील पहिल्या सामन्यात यात प्रथम फलंदाजी करताना साई हुमरठ संघाने मर्यादित ५ षटकात ७ बाद ४९ धावा केल्या. तर फ्रेंडशिप चेंदवण संघ ३९ धावा जमवू शकल्याने हुमरठ संघ १० धावांनी विजयी झाला. हुमरठ संघातर्फे जिमी नाटेकर याने एका षटकात हॅट्ट्रिक साधत सलग चेंडूवर ४ गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात ओशन किंग गोवा संघाने प्रथम फलंदाजी करताना २ बाद ८३ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना फाईट क्लब रत्नागिरी संघ ६ बाद ६६ धावा करू शकल्याने गोवा संघ १७ धावांनी विजयी झाला. मनोज इलेव्हन कसवण विरुद्ध एके फायटर कुंभारमाठ यांच्यातील तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कसवण संघाने ४ बाद ५२ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना कुंभारमाठ संघ ४ बाद ३७ धावा करू शकल्याने कसवण संघ १५ धावांनी विजयी झाला. चौथ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दानिश इलेव्हन देवबाग संघाने ७ बाद ५१ धावा केल्या. यात मंगेश वैती याने सर्वाधिक २७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना वायरी संघ ५ बाद ३५ धावा जमवू शकल्याने देवबाग संघ १६ धावांनी विजयी झाला. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला व दिवसातील पाचवा सामना ओशन किंग गोवा विरुद्ध साई स्पोर्ट्स हुमरठ यांच्यात झाला. यात गोवा संघाने ५ बाद ३५ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना हुमरठ संघाने २ बाद ३४ धावा करत लक्ष्य गाठत विजय मिळविला. तर दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मनोज इलेव्हन कसवण संघ ५ बाद ३५ धावा करू शकला. दानिश देवबाग संघाने लक्ष्य गाठत ९ गड्यांनी विजय मिळविला. यानंतर दानिश इलेव्हन देवबाग विरुद्ध साई स्पोर्ट्स हुमरठ यांच्यात झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात हुमरठ संघाने ६ बाद ६० धावा केल्या. देवबाग संघाने २ गडी गमावत ६१ धावांचे लक्ष्य गाठले. यामुळे देवबाग संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.

दरम्यान, गुरुवारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, ज्येष्ठ संचालिका प्रज्ञा ढवण, माजी नगरसेवक मंदार केणी यांसह अन्य मान्यवरांनी याठिकाणी भेट देऊन बाबा परब मित्रमंडळाच्या कार्याचे कौतुक केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!