कोकणातील नैसर्गिक आपत्तीत प्रभावी मदतकार्यासाठी निलेश राणेंचा पुढाकार
रत्नागिरीत ‘एनडीआरएफ’, ‘एसडीआरएफ’ चा बेस कॅम्प उभारण्याची मागणी
जिल्हाधिकाऱ्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद ; रत्नागिरी अथवा चिपळूणमध्ये बेसकॅम्पसाठी प्रयत्न
रत्नागिरी : माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी शुक्रवारी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची भेट घेऊन जिल्ह्यातील अनेक महत्वाचे विषय त्यांच्यासमोर मांडले. त्यामध्ये कोकणामध्ये सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर ‘एनडीआरएफ’ व ‘एसडीआरएफ’ चा बेस कॅम्प रत्नागिरीमध्ये असावा अशी महत्वपूर्ण मागणी त्यांनी केली. त्याला जिल्हाधिकारी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्याशिवाय मिऱ्या नागपूर चौपादरीकरणाचा मोबदला, काजू उद्योजकांच्या कर्जाचे पुनर्गठन, सर्वांसाठी घर योजनेत कुवारबाव येथे होत असलेली दिरंगाई आणि लांजा कोत्रेवाडीतील डम्पिंग ग्राउंड रद्द व्हावा आणि पर्यायी जागेचा विचार व्हावा अशा मागण्या सुद्धा त्यांनी यावेळी केल्या.
कोकणामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने नैसर्गिक आपत्ती येत आहेत. रायगड , रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने महापूर , चक्रीवादळ आणि दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडत असतात. गेल्या वर्षी महापुरामुळे आणि चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनेत सर्वसामान्य गरीब जनतेच कधीही न भरुन येणारं नुकसान झालं आहे. या आपत्तीपासून वाचण्यासाठी किंवा अशा आपत्ती घडल्यावर तातडीने मदतकार्य मिळण्यासाठी एसडीआरएफ आणि एनडीआरएफचा बेस कॅम्प रत्नागिरी जिल्हयात उभारण्यात यावा. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती जिल्हा असल्याने जर बेस कॅम्प या जिल्ह्यात उभारला गेला तर तो सिंधुदुर्ग आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांसाठी अत्यंत सोयीचा होऊ शकतो. तसेच मदत कार्य करताना एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या जवानांना घटनास्थळी पोहोचणे सहज शक्य आहे. यामुळे भविष्यातील नैसर्गिक आपत्तीचा विचार करून या बेस कॅम्पसाठी तातडीचा पाठपुरावा करावा अशी प्रमुख मागणी माजी खासदार निलेश राणे यांनी केली. याबाबत चिपळूण किंवा रत्नागिरी येथे बेस कॅम्प व्हावा यासाठी लवकरात लवकर पाठपुरावा करू, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
काजू उद्योगांच्या मालमत्ता लिलावाला स्थगिती देऊन कर्जाचे पुनर्गठन
कोरोना महामारीनंतर हा उद्योग आज विविध समस्यांना सामोरे जात आहे . काजू प्रक्रिया उद्योग आर्थिक संकटात सापडला असून गेल्या तिमाहीत बँकेकडून व वित्तीय संस्थांकडून जी कर्ज खाती एनपीए मध्ये गेली आहेत , त्या उद्योगांच्या मालमत्ता एकही संधी न देता ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करून बँका वसुली करत आहे .काजू प्रक्रिया धारक संघाने लीड बँकेकडून तसेच अन्य बँक व वित्तीय संस्था मार्फत होत असलेल्या कारवाईबाबत आपल्याला निवेदन दिल्याचे सांगताना अशा परिस्थितीत काजू उद्योगाला यातून बाहेर काढणे आवश्यक असून कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे , अशी काजू उद्योजकानी मागणी केल्याचे निलेश राणे यांनी सांगितले. त्यामुळे मालमत्ता जप्त करून लिलाव करणे हा त्यावर पर्याय होऊ शकत नाही, या उद्योगाला उभारी देण्यासाठी या कर्जाचे पुनर्गठन करून देणे आवश्यक आहे अशी मागणी निलेश राणे यांनी केली. यावेळी काजू प्रक्रियाधारक संघांचे अध्यक्ष विवेक बारगीर आणि अन्य उद्योजक यावेळी उपस्थित होते. याबाबत लीड बँकेला तशा सूचना आम्ही देऊ, असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
लांजा कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द करावा
लांजा तालुक्यातील कोत्रेवाडी येथे होत असलेल्या डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाच्या परिसरात १०० मीटरवर पाण्याच्या विहिरी आहेत . तसेच लोकवस्ती देखील आहे . या ठिकाणी घनकचरा प्रकल्प झाला तर नागरिकांच्या आरोग्याला हानी होऊ शकते . या कारणामुळे येथील ९० टक्के नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे . शासनाकडे अन्य दोन जागांचे पर्याय असताना देखील सत्ताधारी आणि नगरपंचायत प्रशासन हा प्रकल्प रेटवून नेत आहे . त्यामुळे आपण नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा, अशी भूमिका निलेश राणे यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडली. हा विषय सध्या न्यायालयात प्रलंबित आहे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यावेळी अन्य दोन जागांचा सर्व्हे करण्याच्या सूचना प्रांताना करतो असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
मिऱ्या – नागपूर चौपदरीकरणाचा मोबदला लवकर द्यावा
मिऱ्या – नागपूर महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया २०१७ मध्ये सुरू झाली. संगमेश्वर तालुक्यातील १३ गावांमधील सुमारे १३ लाख ३६ हजार ८३७ चौरस मीटर आणि रत्नागिरी तालुक्यातील १४ गावांमधील ६ लाख ५२ हजार चौरस मीटर क्षेत्र संपादित करण्यात येत आहे. रत्नागिरील ६ आणि संगमेश्वर तालुक्यातील १० अशा एकूण १६ गावांतील जमीन मालकांचा मोबदला निवाडेही फेब्रुवारी २०१९ मध्ये झाले. या निवाड्यांची एकूण रक्कम सुमारे ३१४ कोटी इतकी झाली. वर्षांनंतर फेब्रुवारी २०२० मध्ये केवळ रत्नागिरी तालुक्यातील सहा गावांच्या निवाड्याची रक्कम सुमारे ६९ कोटी रुपये प्राप्त झाली. मात्र कोरोनामुळे निधीवाटप खोळंबले. संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे, करंजारी, जंगलवाडी, दाभोळे, दाभोळे खुर्द, मेढेतर्फ देवळे, कोंडगाव, साखरपा, साखरपा खुर्द, दक्खन, निनावे, ओझरे, मुर्शी या १३ गावांमधील तसेच रत्नागिरी तालुक्यातील झाडगाव, नाचणे, पडवेवाडी, मधलीवाडी, कुवारबाव, कारवांचीवाडी, खेडशी, पानवल, हातखंबा, बाजारपेठ, पाली, साठरे, खानू, नाणीज या १४ गावांमधील जमीन संपादित केली आहे. मात्र अद्याप येथील बहूसंख्य खातेदारांना नोटीस दिल्या गेलेल्या नाहीत. तसेच उर्वरित मोबदला प्राप्त झालेला नाही. याबाबत आपल्या स्तरावरून कार्यवाही होणे, पाठपुरावा करून खातेदारांना नोटीस बजावणी होऊन त्यांचा मोबदला देण्याची तात्काळ सूचना करावी, या माजी खासदार निलेश राणे यांच्या मागणीवर याबाबत तत्काळ कार्यवाही केली जाईल असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
कुवारबाव येथील सर्वांसाठी घर योजनेंत होणारी दिरंगाईकडे लक्ष वेधले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील अत्यंत हलाखीत जगणाऱ्या आणि ज्यांना घरे नाहीत त्यांना ‘सर्वांसाठी घर’ हि योजना सुरु केली . त्यानुसार रत्नागिरी शहरानजीकच्या कातळवाडी, कुवारबाव येथील झोपडपट्टीधारकांनी घर बांधून देण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे चार वर्षांपूर्वी सादर केला आहे . यामध्ये सुमारे ३० जणांना घरे मिळणार आहे . या योजनेच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आलेल्या उपविभागीय अधिकारी , तहसीलदार आणि गटविकास अधिकारी , पंचायत समिती रत्नागिरी यांच्या समितीकडून , लाभार्थ्यांना केवळ प्रक्रिया विनाविलंब करू , अशी पत्रे दिली गेली . कोणत्याही त्रुटी नसताना त्यामध्ये सातत्याने त्रुटी काढल्या जात आहेत . त्यामुळे ४ वर्ष प्रस्ताव प्रलंबित आहे . हा प्रश्न विनाविलंब मार्गी लावावा व संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे तात्काळ आदेश देणेत यावेत अशी मागणीही त्यांनी केली. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडून माहिती मागवून या लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरे मिळवी यासाठी विनविलंब पाठपुरावा करू असेही जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्यासह भाजपा लांजा तालुकाध्यक्ष मुन्ना खामकर, नगरसेवक संजय यादव, मंगेश लांजेकर, भाजपा पदाधिकारी सतेज नलावडे, प्रवक्ते नित्यानंद दळवी, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.