मालवणात “निलेश राणे चषक” क्रिकेट स्पर्धेला दिमाखात प्रारंभ ; उद्योजक दीपक परब यांच्या हस्ते उद्घाटन

सिंधुदुर्गातील उपजत क्रिकेटपटूना पाठबळ देण्यासाठी पाठपुरावा करा

डॉ. दीपक परब यांचे आवाहन ; बाबा परब मित्रमंडळाच्या कार्याचे मान्यवरांकडून कौतुक

कुणाल मांजरेकर

मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डींग मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या “निलेश राणे चषक” राष्ट्रीय स्तरावरील खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला बुधवारी दिमाखात प्रारंभ झाला आहे. उद्योजक डॉ. दीपक परब यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

सिंधुदुर्गातही मोठ्या प्रमाणात उपजत कला गुण असलेले अनेक क्रिकेटपटू असून यातील काहींनी आयपीएल सारख्या स्पर्धांमध्येही आपली चुणूक दाखविली आहे. मात्र योग्य मार्गदर्शन नसल्याने हे क्रिकेटपटू मागे पडतात. बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशनने अशा उपजत क्रिकेटपटूंना पाठबळ देण्यासाठी प्रयत्न करावेत. बाबा परब मित्रमंडळाच्या पाठीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि युवा नेते निलेश राणे यांचा हात आहे. त्यामुळे युवा क्रिकेटपटूंना याचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास उद्योजक डॉ. दीपक परब यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी सहाव्या वर्षी भव्य दिव्य प्रमाणात होणाऱ्या बाबा परब मित्रमंडळाच्या क्रिकेट स्पर्धेचे कौतुक केले. यंदा या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघास तीन लाख रुपये आणि आकर्षक निलेश राणे चषक तर उपविजेत्या संघास दीड लाख रुपये आणि आकर्षक निलेश राणे चषक दिला जाणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब मित्र मंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर २३ ते २६ जानेवारी या कालावधीत “निलेश राणे चषक” डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी उद्योजक डॉ. दीपक परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धाप्रमुख बाबा परब, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, महेन ढोलम, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी सभापती अजिंक्य पाताडे, माजी उपसभापती राजू परुळेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, अनिल कांदळकर, गणेश कुशे, संतोष साटविलकर, आपा लुडबे, अशोक तोडणकर, पूजा सरकारे, पूजा करलकर, महेश मांजरेकर, जॉन नरोन्हा, रवी मालवणकर, राजू बिडये, अमोल हुनारी, बबन रेडकर, ललित चव्हाण, अजय शिंदे, विक्रांत नाईक, हरेश गावकर, आबा हडकर, नंदू देसाई यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अशोक सावंत, सुदेश आचरेकर, धोंडी चिंदरकर, विजय केनवडेकर यांसह उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडताना बाबा परब मित्रमंडळाच्या कार्याचे कौतुक केले. सुदेश आचरेकर यांनी या स्पर्धेच्या निमित्ताने मागील १० वर्षात मालवणात क्रीडा- सांस्कृतिक महोत्सव घेण्यात अपयशी ठरलेल्या सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करत राणे कुटुंबीय आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातूनच असे मोठमोठे उपक्रम जिल्ह्यात सुरू असल्याचे सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!