तळाशीलच्या बंधाऱ्यासाठी दहा दिवसांत किमान दहा कोटींचा निधी : निलेश राणेंची ग्वाही
मालवण (प्रतिनिधी) : तळाशिल गावाची सागरी अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. मात्र येथील १६०० मीटर लांबीच्या बंधाऱ्याकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी रविवार पासून तळाशिल गावात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी सोमवारी या ठिकाणी भेट देऊन येथील किनारपट्टीची पाहणी केली. यावेळी तळाशिलच्या बंधाऱ्यासाठी केंद्र शासन आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून दहा दिवसांत दहा कोटी रुपयांचा निधी आणू, असा शब्द निलेश राणेंनी ग्रामस्थांना दिला आहे. केंद्रीयमंत्री राणेसाहेबांच्या सूचनेनुसार मी इकडे आलो असून लवकरच स्वतः राणेसाहेब तळाशिलमध्ये येऊन ग्रामस्थांची भेट घेतील, असेही ते म्हणाले.
सागरी अतिक्रमणामुळे तळाशिल गावाची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. येथील बंधाऱ्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधूनही कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याने स्वातंत्र्य दिनापासून ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी भाजप नेते निलेश राणे यांनी याठिकाणी भेट देऊन किनारपट्टीची पाहणी केली. यानंतर उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा करून त्यांची समस्या पुन्हा एकदा जाणुन घेतली. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, सभापती अजिंक्य पाताडे, बाबा परब, विजय केनवडेकर, गणेश कुशे, महेश मांजरेकर, विकी तोरसकर, आनंद शिरवलकर, जगदीश चव्हाण, संजय तारी यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि तळाशील ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार वैभव नाईक यांनी तळाशीलच्या बंधाऱ्यासाठी काही लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती. त्याचा निलेश राणेंनी समाचार घेतला. पालकमंत्र्यांनी स्वतःच्या माध्यमातून निधी देण्याचं आश्वासन देण्याकरिता स्वतः येथे येणे आवश्यक होतं. मात्र जो पालकमंत्री इकडे आलाच नाही, तो निधी कुठून देणार ? चिवला बीच येथे साधारण १ किमी बंधाऱ्यासाठी २२ कोटींचा निधी खर्च झाला आहे. मग काही लाखांमध्ये ही लोकं कोणता बंधारा बांधणार आहेत ? असा सवाल करून अशा भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन निलेश राणेंनी केलं. राणेसाहेबांनी १९९० मध्ये देवबाग गाव वाचवण्यासाठी कायमस्वरूपी बंधारा उभा केला. मात्र त्यासारखं काम अन्य कुणीही केलं नाही. आपल्याला तळाशीलमध्ये त्या प्रकारचा बंधारा उभारायचा आहे. त्यासाठी इकडे येतानाच मी राणे साहेबांशी बोलून आलो असून येत्या १० दिवसात राणेसाहेबांच्या माध्यमातून बंधाऱ्यासाठी निधीचं पत्र घेऊन येइन. ही रक्कम किमान १० कोटींपेक्षा कमी नसणार, असे निलेश राणे म्हणाले.
… तर अधिकाऱ्यांना कार्यालयात जाऊन फटकावणार : निलेश राणेंचा इशारा
तळाशीलमध्ये बंधाऱ्याचे काम मंजूर झाल्यानंतर हे काम दर्जेदारच झाले पाहिजे. त्यामुळे पोलिसांच्या समक्षच सांगतो, बोगस काम झालं तर अधिकाऱ्यांना कार्यालयात जाऊन फटके देणार, असा सज्जड इशारा निलेश राणे यांनी दिला. मागील दोन- अडीच वर्षांपासून सगळ्यांची मजा सुरू आहे. एकही अधिकारी जाग्यावर मिळत नाही, अशा शब्दांत निलेश राणेंनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, ग्रामस्थांनी कोणत्याही प्रकारच्या भूलथापाना बळी पडू नका, असे आवाहन करतानाच तुम्हाला कोणी त्रास दिला तर माझा नंबर डायल करा, तुमच्या अगोदर निलेश राणे उभा राहील, मी आणि माझी संघटना इथून पुढे तुमच्या लढाईत तुमच्या बाजूने उभे राहू, असे ते म्हणाले.