शरद पवार… पवार कुटूंब… आणि निलेश राणेंचे “ते” चार ट्विटस् !
“त्या” ट्विट नंतर राज्याच्या राजकारणात खळबळ ; पवार कुटुंबावर थेट “प्रहार”
कुणाल मांजरेकर
राज्यात सध्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजपातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. एकमेकांवर घणाघाती वार केले जात असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून भाजपच्या नेत्यांवर होणाऱ्या टीकेला भाजपचे प्रदेश सचिवज माजी खासदार निलेश राणे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. पवार साहेबांना राजकारणी लोकांनी ‘जाणता’ म्हणणं कायमचं थांबवलं पाहिजे. कारण पवारांनी जेव्हा संधी मिळाली तेव्हा महाराष्ट्राला अस्थिरचं केलं आहे, अशी टीका करतानाच लवासा प्रकरणात हायकोर्टाने पवार कुटुंबावर ताशेरे ओढले आहेत, तरीही सरकार त्यांवर काहीच ॲक्शन घेत नसल्याने येणाऱ्या आठवड्यात लवासा प्रकरणी आम्ही सुप्रीम कोर्टात अपील करणार आहोत, असा इशारा देखील निलेश राणेंनी दिला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी महाविकास आघाडी सरकार विरोधातील व्हिडीओ बाहेर काढल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय यंत्रणांच्या होत असलेल्या गैरवापरावरून भाजपवर सडकून टीका केली होती. त्याचा भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विटरवर समाचार घेतला आहे. निलेश राणेंनी दिवसभरात तब्बल चार ट्विट केले असून यामधून शरद पवारांवर आसूड ओढले आहेत.
“पवार साहेब नावाने मोठे झाले असले तरी मनानी मोठे नाहीत. त्यांनी वर्षोनुवर्षे केलेल्या कारस्थानामुळे आज महाराष्ट्र भोगतोय, त्यांनी पोसलेले किडे आज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी धुडगूस घालत आहेत. पवार साहेबचं पाकिस्तानचे एजंट तर नाही ना असा संशय यायला लागला आहे.” असं पहिलं ट्विट निलेश राणेंनी बुधवारी सकाळी १०.२६ वाजता करून खळबळ उडवून दिली. हे ट्विट कमी होतं की होतं की काय, म्हणून सकाळी ११.५५ वाजता “पवार साहेबचं दाऊदचा माणूस असू शकतात.” असं दुसरं ट्विट निलेश राणेंनी केलं. त्यानंतर शांत असलेल्या निलेश राणेंनी सायंकाळी ६.४७ वाजता पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर टीकेचे घाव केले. “खोट्या केसेस बनवणारा साहेबांचा माणूस सरकारी वकील प्रवीण चव्हाण गायब झाला आहे” असं सांगून “पवार साहेबांना राजकारणी लोकांनी ‘जाणता’ म्हणणं कायमचं थांबवलं पाहिजे. कारण पवारांनी जेव्हा संधी मिळाली तेव्हा महाराष्ट्राला अस्थिरचं केलं आहे.” असा आरोप निलेश राणेंनी केला.
त्या पाठोपाठ सायंकाळी ७.३२ वाजता चौथं ट्विट करून “लवासा प्रकरणामध्ये पवार कुटुंब फ्रॉड आहे इतकंच सांगणं हायकोर्टाने शिल्लक ठेवलं. तरीही प्रशासन ॲक्शन घेत नाही. पवार कुटुंबाने फ्रॉड केला आहे हे हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये स्पष्ट आहे. येणाऱ्या आठवड्यात लवासा प्रकरणी आम्ही सुप्रीम कोर्टात अपील करणार आहोत. Pawar Family = Fraud” असं निलेश राणेंनी म्हटलं आहे. निलेश राणे हे आक्रमक बाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. दिवसभरात चार ट्विट करून पवार कुटुंबाला थेट भिडण्याची ताकद निलेश राणेंनी दाखवून दिली आहे. त्यामुळे राजकिय गोटात एकच खळबळ माजली आहे.