मालवण नगरपालिकेतर्फे लवकरच भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण मोहीम

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची माहिती

सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन कोल्हापूर संस्थेची निविदा मंजूर

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या असून भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी नगरपालिकेने सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन कोल्हापूर संस्थेची निविदा मंजूर केली आहे. आडारी येथे नसबंदी केंद्राचे काम सुरू असून पालिकेच्या वतीने लवकरच भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली आहे

शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाय योजना म्हणून २०१७ साली पालिकेने एका एजन्सी मार्फत मालवण न. प. च्या वतीने पालिकेच्या आवारात भटके कुत्रे निर्बीजीकरण मोहिम सुरू करण्यात आली होती. पण नंतर या एजन्सी कडून काम करण्यास असमर्थता दाखवल्यामुळे हे काम थांबले होते. त्यानंतर मागील दोन वर्षे या कामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. पण त्यांना प्रतिसाद मिळाला नव्हता. शेवटी ८ डिसेंबर २०२१ रोजी पालिकेने प्रसिद्ध केलेल्या चौथ्या निविदेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आणि सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन कोल्हापूर यांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. या कामाचे आदेश संबंधित निविदा धारकास देण्यात आले आहेत. या नसबंदी केंद्राचे बांधकाम सध्या आडारी येथे सुरू आहे. लवकरच या ठिकाणी कुत्रे निर्बीजीकरणच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती महेश कांदळगावकर यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!