आचऱ्यातील रामेश्वर विकास सोसायटीवर सत्ता परिवर्तन !
भाजप पुरस्कृत पॅनलचा एकतर्फी विजय : शिवसेनेचा दारुण पराभव
सर्व १३ ही जागांवर विजय : शिवसेनेचा एका जागेवरील विजयाचा आनंदही क्षणिक
कुणाल मांजरेकर
मालवण : शिवसेनेची सत्ता असलेल्या आचरा येथील श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपप्रणित सहकार पॅनेलने सर्वच्या सर्व १३ ही जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. येथील एका जागेवर शिवसेना पुरस्कृत पॅनेलच्या उमेदवाराचा विजय झाला होता. मात्र याला भाजपने आक्षेप घेतल्यानंतर दोनदा झालेल्या फेरमोजणीत याठिकाणी भाजपाचा विजय झाला. त्यामुळे एका जागेवरील विजयाचा आनंदही क्षणिक ठरला. या विजयानंतर विजयी उमेदवारांसह भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
या सोसायटीची सन २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीसाठीची निवडणूक आचरा केंद्रशाळेत घेण्यात आली. या सोसायटीवर शिवसेनेची सत्ता होती. मात्र यंदाच्या निवडणूकीत भाजपप्रणित सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले. यामध्ये भाजप पुरस्कृत पॅनल मधून (सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी) प्रिया वामन आचरेकर, समीर रघुवीर बावकर, प्रफुल्ल संजय घाडी, अवधुत रमाकांत हळदणकर, भिकाजी रावजी कदम, लवू नारायण मालंडकर, संतोष गणपत मिराशी, प्रशांत दाजी पांगे, भटक्या विमुक्त जाती / जमाती व विशेष मागास प्रवर्ग मधून प्रमोद विष्णू कोळंबकर, अनुसुचित जाती / जमाती प्रतिनिधी मधून लक्ष्मण भिवा आचरेकर, महिला प्रतिनिधी निशा गुणाजी गांवकर, मनाली महादेव तोंडवळकर, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मधून धनंजय दत्ताराम टेमकर विजयी झाले.
विजयी उमेदवारांचे भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, माजी सभापती नीलिमा सावंत, जि. प. सदस्य जेरॉन फर्नांडिस, महेश मांजरेकर, सरपंच प्रणया टेमकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.