गोल्डन गायक बप्पी लाहिरी यांचे निधन
मुंबई : मागील पाच दशके आपल्या संगीत आणि आवाजाने बॉलिवूडवर छाप सोडणारे ज्येष्ठ संगीतकार व गायक बप्पी लहिरी यांचे मंगळवारी रात्री वयाच्या ७० व्या निधन झाले. मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
आलोकेश लहिरी असे बप्पी यांचे मूळ नाव होते. बॉलिवूडमध्ये ‘बप्पीदा’ अशी ओळख असलेले बप्पी लहिरी यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. जुहू येथील हॉस्पिटमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला होता. बप्पीदा यांनी शेकडो चित्रपटांना संगीत दिलं. तसेच अनेक गाणीही स्वत: गायली. त्यातली कित्येक गाणी आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहेत. १९७३ मध्ये ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटातून संगीतकार म्हणून पदार्पण केलेल्या बप्पी लाहिरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या हटक्या संगीताने छाप सोडली. ऐंशी-नव्वदीच्या दशकात त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांनी तरुणाईला वेड लावले होते. त्यांच्या संगीतातील ही जादू कायम होती. ‘डर्टी पिक्चर’ या चित्रपटातील त्यांनी संगीतबद्ध आणि पार्श्वगायन केलेले ‘उ लाला’ हे गाणंही चांगलेच लोकप्रिय ठरले होते. बप्पी लहिरी यांनी डिस्को डान्सर, हिम्मतवाला, शराबी, अॅडव्हेंचर्स ऑफ टारझन, डान्स डान्स, सत्यमेव जयते शोला और शबनम यासारख्या चित्रपटांसाठी गाणी संगीतबद्ध केली. बप्पी यांनी २०१४ साली भाजपकडून पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती.