भुयारी गटार योजेनेबाबत भाजपमध्येच मतभिन्नता ; महेश कांदळगावकर यांचा हल्लाबोल

वराडकर- आचरेकर यांच्यात मतमतांतरे : सुदेश आचरेकर यांचे पालिकेत सत्तेत येण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार

आचरेकरांच्या नाकर्तेपणामुळे बंद स्थितीतील योजनेला आ. वैभव नाईकांच्या पाठपुराव्यामुळे निधी

कुणाल मांजरेकर

मालवण : भाजपाचे माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि गटनेते गणेश कुशे आ. वैभव नाईक यांचे समर्थन करून भुयारी गटार योजना रखडल्याबद्दल संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची मागणी करतात. तर दुसऱ्या दिवशी भाजपचे नेते, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर ठेकेदाराची पाठराखण करत आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करतात. या दोन्ही पत्रकार परिषदांना गटनेते गणेश कुशे उपस्थित असतात. त्यामुळे भुयारी गटार योजनेवरून भाजपा मध्येच मतमतांतरे असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केला आहे. सुदेश आचरेकर यांच्या कालावधीत भुयारी गटार योजना बंदस्थितीत होती. नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आल्यानंतर या या योजनेसाठी कर्ज काढण्याची नामुष्की आली असताना आमदार वैभव नाईक यांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून या योजनेसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे गेली दोन वर्षे हे काम रखडले आहे. आता भुयारी गटार योजनेचे राजकारण करून नगरपालिकेवर सत्तेत येण्याचे सुदेश आचरेकर यांचे स्वप्न आहे. मात्र ही योजना कोणाच्या चुकीमुळे बंद पडली आणि कोणाच्या प्रयत्नातून या योजनेला निधी मंजूर झाला, हे शहरातील जनतेला ज्ञात असल्याने सुदेश आचरेकर यांचे आगामी नगरपालिका निवडणुकीत सत्तेत येण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार असल्याची टीका श्री. कांदळगावकर यांनी केली आहे.

मालवण नगरपालिकेवर प्रशासक नियुक्त झाल्यामुळे आता शहरात नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. शहरातील बहुचर्चित भुयारी गटार योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असून भाजप नेते सुदेश आचरेकर यांनी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि आमदार वैभव नाईक यांच्यावर केलेल्या टीकेला श्री. कांदळगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून उत्तर दिले आहे. या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यशैलीवर जाहीर सभेतून स्तुतीसुमन उधळणाऱ्या आचरेकर याना भुयारी गटारच्या कामाबाबत अचानक आमदारांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित का करावी लागली, तर याचे कारण भुयारी गटार नसून १५ दिवसांपूर्वी आ. नाईक यांनी आचरेकर यांच्या प्रभागात बैठकीच्या वेळी तिकडच्या लोकांनी मागणी केल्याप्रमाणे रस्त्यासाठी ३० लाख रुपये निधी आठ दिवसाचे आत मंजूर केल्यामुळे आहे.

त्यावेळी सुदेश आचरेकरांचा अभ्यास कच्चा होता का ?

२०१२-१३ साली आचरेकर यांच्या कालावधीतच भुयारी गटार योजना रद्द करण्याचा ठराव करण्यात आला. आता आ. नाईक यांनी ठेकेदाराच्या कामात सुधारणा झाली नाही तर कारवाई करणार, असे म्हटल्यावर आचरेकर यांनी आमदारांना अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. मग २०१२-१३ साली आचरेकर यांच्या कालावधीत याच ठेकेदाराच टेंडर रद्द करण्याबाबत ठराव करून तो जिल्हाधिकारी यांच्याकडे का पाठविण्यात आला होता ? त्यावेळी आचरेकर यांचा अभ्यास कच्चा होता की आणखी काही कारण होतं ? असा सवाल महेश कांदळगावकर यांनी केला आहे.

योजनेसाठी कर्ज काढण्याची नामुष्की वैभव नाईकांमुळे टळली

सुदेश आचरेकर यांच्या कालावधीत २००९ साली नारायण राणे यांनी मंजूर करून दिलेली भुयारी गटर योजना चुकीच्या नियोजना १० वर्षात पूर्ण करण्यात आली नव्हती. ही योजना बंद होती आणि निधी अभावी कर्ज काढण्याची नामुष्की न. प. वर आलेली होती. आम्ही २०१६ मध्ये सत्तेत आल्यावर ही बंद असलेली योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. शासनाने कर्ज काढुन ही योजना पूर्ण करण्याबाबत सूचित केले होते. पण याबाबत आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधल्यावर त्यांनी खासदार विनायक राऊत, तत्कालीन पालकमंत्री दिपक केसरकर यांच्यामार्फत शासन स्तरावर पाठपुरावा करून सुमारे ९ कोटी रुपये अनुदान प्राप्त करून दिले. त्यामुळे नगरपालिकेवरची कर्जाची नामुष्की टळली गेली. आणि या कामाला सुरुवात झाली. मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीमूळे सर्वच विकास कामाना फटका बसला आहे. भुयारी गटार बाबत सुद्धा विलंब झाला ही वस्तुतिथी आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न पण सुरू आहेत. पण येणाऱ्या निवडणुका विचारात घेऊन ज्या कामासाठी आ. वैभव नाईक आग्रही आहेत, त्या कामाबाबत निवेदन केलेल्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढून त्याचे राजकीय भांडवल करण्याचा आणि आपल्या चुका झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजप मार्फत केला जात असल्याची टीका श्री. कांदळगावकर यांनी केली आहे.

भाजपमध्ये एकमत नाही, स्वतःच्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडण्याचा प्रयत्न

भुयारी गटार योजनेबाबत भाजप पक्षातच एकमत दिसत नाही. आदल्या दिवशी भाजप मधून निवडून आलेले माजी उपाध्यक्ष राजन वराडकर आणि गणेश कुशे हे भुयारी गटारच्या ठेकेदाराला काळ्या यादीत घालण्या बाबत पत्रकार परिषद घेऊन आमदार वैभव नाईक यांची भूमिका योग्य असल्याबाबत सांगतात आणि लगेच दुसऱ्या दिवशी भाजप कार्यालयात सुदेश आचरेकर हे ठेकेदार यांच्यावर कारवाई करणे योग्य नसून आमदार नाईक यांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करतात. आणि या दोन्ही पत्रकार परिषदांना गणेश कुशे उपस्थित राहतात. त्यामुळेच भुयारी गटारबाबत भाजप मधेच एकवाक्यता नाही. येणाऱ्या निवडणुकीत आपल्या अपयशाच खापर दुसऱ्याच्या माथी मारण्याच काम भाजपा कडून सुरू असल्याचे महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

स्वप्न बघण्याचा प्रत्येकाला अधिकार, पण…

१० वर्ष आपली सत्ता असताना आणि आचरेकर सर्वेसर्वा असताना भुयारी गटार योजना सुरू होऊ शकली नाही. चुकीच्या पद्धतीने निधीचा वापर करण्यात आला. आता पुढील निवडणुकीत भाजपची सत्ता येणार आहे अशी वल्गना भाजप कडून केली जात आहे. त्यामूळे ज्याच्या कारकिर्दीत ही योजना बंद पडली त्यांना लोक स्वीकारणार की ज्यांनी ही योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न केला त्यांना स्वीकारणार याचा विचार भाजपने केला नसेल. पण सत्तेचं स्वप्न बघण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. पण आचरेकर यांचं स्वप्न हे स्वप्नचं राहील असे महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!