भ्रष्टाचाराने माखलेल्या शिवसेनेच्या नेत्यांवर शेणाने हल्ले केले पाहिजेत ; राणेंचा घणाघात
भाजप नेते किरीट सोमय्यांवरील हल्ल्याचा नारायण राणेंनी केला निषेध
असे हल्ले भाजपा सहन करणार नाही ; जशास तसे उत्तर देण्याचा इशारा
कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग : भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी पुणे येथे शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्याचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निषेध केला आहे. असे हल्ले भाजपा सहन करणार नाही, यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा राणेंनी दिला आहे.
भ्रष्टाचाराच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी सुरू केलेल्या मोहीमेला घाबरून त्यांच्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला आहे, हे उघड आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे नेतेही भ्रष्टाचाराने माखलेले आहेत. अशा नेत्यांवर जनतेने हल्ला केल्यास त्यांना काय वाटेल ? अशा भ्रष्ट नेत्यांवर खरं तर शेणाचे हल्ले केले पाहिजेत. अशा भ्याड हल्ल्यानंतर किरीट सोमय्या किंवा भाजप शांत बसेल या भ्रमात महाविकास आघाडी सरकारने राहू नये. सोमय्याजी यांनी सुरू केलेल्या लढाईत ते एकटे नसून संपूर्ण पक्ष त्यांच्यासोबत आहे. आमची ही लढाई कायद्याच्या मार्गाने सुरू राहील, असेही नारायण राणेंनी म्हटले आहे.