सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या “या” आवाहनाला पर्यटन व्यावसायिक महासंघाचा आक्षेप !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी होतोय व्यापारी एकता मेळावा
कुणाल मांजरेकर
मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने सोमवारी ३१ जानेवारीला व्यापारी एकता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाने पाठिंबा दिला आहे. मात्र हा मेळावा व्हर्च्युअल पद्धतीने होत असताना व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन मेळाव्याला ऑनलाईन उपस्थिती दाखवण्याच्या पर्यटन व्यावसायिक महासंघाने विरोध केला आहे. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू ठेऊन या मेळाव्याला ऑनलाइन उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
याबाबत श्री. मोंडकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग च्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आयोजित व्यापारी एकता मेळाव्यास आमचा पाठींबा आहे. व्यापारी वर्गाच्या न्याय हक्कासाठी ही संघटना चांगले कार्य करत आहे. पर्यटन महासंघ स्थानिक व्यावसायिकांच्या न्याय हक्कासाठी काम करणाऱ्या सर्व संघटनांच्या सोबत आहे. परंतु व्यापारी महासंघाच्या व्यवसाय बंद ठेऊन सहभाग या आवाहनाला पर्यटन व्यावसायिक महासंघाचा विरोध आहे. दोन वर्षात कोरोना महामारीमुळे उध्वस्त झालेल्या व्यावसायिकाला व्यवसाय बंद ठेवणे हे आवाहन चुकीचे वाटते. तसेच सदर मेळावा हा व्हर्च्युअल (ऑनलाईन) पध्दतीने असल्याने आपण व्यवसाय चालू ठेवूनही मेळाव्यात सहभागी होऊ शकता. पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या विचारधारेशी जोडलेल्या सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवसाय चालू ठेऊन ऑनलाईन व्यापारी मेळाव्यात आपला सहभाग दर्शवावा, असे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे.