शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दशावतारी कलाकारांचा सत्कार
मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने देवबाग येथे आयोजन ; पंचक्रोशीतील २५ कलाकारांचा सन्मान
कुणाल मांजरेकर
मालवण : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने देवबाग येथे दशावतारी कलाकारांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी पंचक्रोशीतील २५ दशावतारी कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
देवबाग महापुरुष रंगमंचावर या कार्य्रक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, भगवान लुडबे, ज्येष्ठ दशावतारी कलाकार जीजी चोडणेकर, आबा कुर्ले, विलास वालावलकर, सिताकांत तांडेल, प्रसाद चव्हाण, उपविभागप्रमुख अनिल केळुसकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना दशावतारी कलाकार जिजी चोडणकर म्हणाले, माझा हा दशावतार प्रवास इथवर येऊन पोचण्याचे कारण ठरले ते एका कलाकाराने निरोप देताना म्हटले की, गाबतांचे हे काम नव्हे गाबतांनी बांगडे मारावे आणि वाटे घालावे… त्यामुळे गाबीत फक्त वाटे घालत नाही तर रंगमंच देखील दणाणून सोडतात, हे आपण दाखवून दिले. आपण गेली ३५ वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. अनेक चढ उतार अनेक अडचणींवर मात केली. अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांच्या हस्ते झी गौरव पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले. अर्थात हा सत्कार माझा नसून या देवबाग गावचा आहे, असे ते म्हणाले.
यावेळी देवबाग पंचक्रोशीतील २५ दशावतारी कलाकारांचा सत्कार संपन्न झाला. यात आनंद मेस्त्री, बाबा उपरकर , बाबू मांजरेकर, यशवंत मांजरेकर, विनोद देऊलकर, निलेश देऊलकर, मंगेश खोबरेकर, रुपेश लोंढे, सायबा केळुसकर, गिरिधर गावकर, रवी भांजी, विजय मालंडकर, भाऊ गोवेकर, गजानन मांजरेकर, जिजी राऊळ, महेश तांडेल, दिनेश राऊळ, नंदकिशोर कांदळगावकर, विजय चोपडेकर, तुषार चोपडेकर, विलास तांडेल, मुकेश कांदळगावकर, बाबी राऊळ, सिद्धेश देऊलकर, उमेश परुळेकर यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर म्हणाले, देवबागचे कलाकार अनोखे आहेत. झी टीव्ही ने देखील त्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार केला. पूर्वीच्या काळी अशी परिस्थिती नव्हती. आता तर आपण घरात बसून देखील दशावतार पाहू शकतो. पूर्वी दशावतारी कलाकारांना कोणतेही सहकार्य नव्हते. परंतु आता दशावतारी कलेला जनतेकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रशासनाकडून देखील पाठिंबा मिळत आहे. ही कला जपली पाहिजे, असे सांगून देवबाग हा मच्छीमारी भाग आहे. तरी देखील येथील अनेक कलाकार नावारूपाला आले आहेत. त्यामुळे ही कला जपली पाहिजे. हरी खोबरेकर यांच्यासारखे एक चांगले नेतृत्व तुम्हाला मिळालेले आहे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक गजानन मांजरेकर यांनी केले.